सांगेलीतील गिरीजानाथ प्रतिष्ठापना सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी, दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान 

By अनंत खं.जाधव | Published: March 25, 2024 05:36 PM2024-03-25T17:36:57+5:302024-03-25T17:37:48+5:30

फणसाच्या खोडापासून शेकडो सुतार कारागीरांनी घडविली गिरोबाची मूर्ती

A large crowd of devotees attended the installation ceremony of Girijanath in Sangeli, The only shrine in Konkan to re-establish every year | सांगेलीतील गिरीजानाथ प्रतिष्ठापना सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी, दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान 

सांगेलीतील गिरीजानाथ प्रतिष्ठापना सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी, दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान 

सावंतवाडी : ग्रामदेवतेची दरवर्षी पुन: प्रतिष्ठापना करणारे कोकणातील एकमेव देवस्थान असलेल्या सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथाची पुन: प्रतिष्ठापना हरहर महादेवच्या जयघोषात विधीवत करण्यात आली. 

या गावच्या आगळ्यावेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ग्रामदेवतेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला भाविकांची झालेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी हे यावर्षीच्या गिरोबा उत्सवाचे खास वैशिष्ट्य ठरले. असून या उत्सवासाठी भाविकांचा महापूर लोटला होता. हजारो भाविक गिरीजानाथ चरणी नतमस्तक झाले होते.

शनिवारी सायंकाळपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तब्बल सहा तासानंतर फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती शेकडो सुतार कारागीरांनी घडविली. या धार्मिक कार्यात सांगेली परिसरातील शेकडो सुतार समाज्यातील कारागीरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

 दरम्यान मध्यरात्री असूनही या उत्सवासाठी भाविकांचा ओघ सुरूच होता. तब्बल २४ वर्षानंतर सनामटेंबवाडीत हा उत्सव होत असल्यामुळे सनामटेंबवाडीवासियांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले होते. गिरोबाची मूर्ती साकारल्यानंतर प्रतिष्ठापनेसाठी रविवारी मध्यरात्री १२ नंतर सनामटेंबवाडी येथुन सवाद्य मिरवणुकीने गिरिजानाथ मंदिराकडे निघाली. 

 या मिरवणुकी दरम्यान गिरोबाच्या या मूर्तीला खांद लावण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी शेकडो भाविकांनी गिरोबाला खांद लावण्याचा नवसफेड केला. यावेळी मिरवणुकीच्या मार्गादरम्यान सांगेलीवासियांनी गिरिजानाथाची मूर्ती घडवणाऱ्या सुतार समाजाकडे तळी प्रदान केली. साखर झोपेची पहाटेची वेळ असूनही या धार्मिक सोहळ्यासाठी गिरीजानाथ मंदिर ते देवकरवाडी मार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजलेला होता.

 तसेच या मार्गातील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. नेत्रदीपक आतषबाजीसह वाजत गाजत नाचत ही मिरवणूक तब्बल चार तासानंतर पहाटे ४ वाजता गिरिजानाथ मंदिराकडे पोहोचली. यावेळी जुना देव नेमातून काढूल्यानंतर जुना आणि नवीन देवाची भेट घडविण्यात आली. दोन्ही देवतांच्या भेटीचा हा अनुपम सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पहाटे साडे पाचच्या सुमारास हरहर महादेव च्या जयघोषात विधीवत गिरीजानाथाची पुन: प्रतिष्ठापना करण्यात आली.

त्यानंतर रविवारी सकाळपासूनच सायंकाळ पर्यंत हजारो भाविकांनी गिरीजानाथाचे दर्शन घेतले. 
गिरीजानाथाच्या दर्शनासाठी दिवसभरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या उत्सवासाठी सोहळ्यासाठी जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी आदी भागातील भाविक आवर्जून उपस्थित होते.

Web Title: A large crowd of devotees attended the installation ceremony of Girijanath in Sangeli, The only shrine in Konkan to re-establish every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.