माजी विद्यार्थ्यांकडून तिघांना आर्थिक बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:55 PM2019-06-29T22:55:25+5:302019-06-29T22:55:31+5:30

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सैनिक स्कूलमधील तीन टॉपर विद्यार्थ्यांचे शिक्षण ...

Three students financially strengthened! | माजी विद्यार्थ्यांकडून तिघांना आर्थिक बळ!

माजी विद्यार्थ्यांकडून तिघांना आर्थिक बळ!

Next

प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सैनिक स्कूलमधील तीन टॉपर विद्यार्थ्यांचे शिक्षण जवळपास थांबण्याच्या गतीवर आले. समाजमाध्यमाद्वारे आवाहन करून काही उपयोग होतो का पाहू या, असं म्हणत एक पोस्ट व्हायरल झाली आणि अवघ्या ४८ तासांत या तिन्ही मुलांचं शिक्षण पूर्ववत होणार यावर शिक्कामोर्तब झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा सैनिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या तीन मुलांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शाळेतून दाखला काढण्यासाठी अर्ज आले. शैक्षणिकदृष्ट्या पहिल्या दहामध्ये येणाºया या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा अर्ज पाहून शाळा व्यवस्थापनालाही धक्का बसला. यातील एका विद्यार्थ्याचे वडील गवंडी आहेत, दुसºयाचे शेतकरी आणि तिसºयाचे बेस्टमध्ये चालक आहेत. या तिघांचीही परिस्थिती अगदीच बेताची असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.
त्यानंतर ले. कर्नल रणजितसिंह नलवडे यांनी सोशल मीडियावर या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची एक पोस्ट व्हायरल केली. सैनिक स्कूलच्या सुमारे १६० विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे करत सुमारे ४ लाख ४६ हजार रुपये उभे केले. यातून या तिन्ही विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरळीत व्हायला मदत झाली. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना सैनिकी शिक्षण मिळावे, या उद्देशाने देशातील पहिली सैनिक स्कूलची स्थापना साताºयात करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षांत शासनाकडून शाळेला येणारा निधी अनेक स्तरांवर अडकला. परिणामी शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांवरही हा आर्थिक ताण येऊ लागला.

माय कॉस्ट
आॅफ पिझ्झा..!
सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावरील या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘माय कॉस्ट आॅफ विकएण्ड, पिझ्झा, बर्गर..’ असा मेसेज करत त्यांनी शाळेच्या खात्यांवर पैसे जमा केले. आपल्या एक दिवसाच्या पार्टीसाठी खर्च न करता ती रक्कम त्यांनी या तीन गरजूंसाठी उपलब्ध करून दिली. माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचे शाळेच्या प्राचार्या ग्रुप कॅप्टन मनीषा मिश्रा यांनीही कौतुक केले.

चेकनेही मदत!
देशभरात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एक हजारापासून अगदी २५ हजार रुपयांपर्यंत मदत केली. कोणी हे पैसे आॅनलाईन ट्रान्सफर केले. तर काहींनी याचे चेक कार्यालयात पाठवून दिले.

दातृत्वाचा पुन्हा अनुभव
सातारा सैनिक शाळेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी आहेत. गतवर्षीही त्यांना असेच आवाहन केले होते. तेव्हाही त्यांनी भरभरून मदत केली. यंदाही केवळ त्यांच्या मदतीमुळे शाळेतील तीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं शक्य होणार आहे.
- ले. कर्नल रणजितसिंह नलवडे,
रजिस्ट्रार, सातारा सैनिक स्कूल

Web Title: Three students financially strengthened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.