वही आमची; भविष्य त्यांचे!

By Admin | Published: February 15, 2015 10:11 PM2015-02-15T22:11:30+5:302015-02-15T23:40:27+5:30

वीस हजार वह्यांचे संकलन : गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी गु्रपची स्थापना

That's ours; Future theirs! | वही आमची; भविष्य त्यांचे!

वही आमची; भविष्य त्यांचे!

googlenewsNext

परळी : ग्रामीण भागात शिक्षण घेताना आपल्याला बसलेले चटके इतर विद्यार्थ्यांना बसू नयेत, म्हणून ग्रामीण भागातून नोकरीसाठी मुंबई, पुणे याठिकाणी गेलेली तरुणाई त्यासाठी आता सरसावली आहे. प्रायोगिक तत्त्वावर वीस हजार वह्यांचे संकलन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्याचा संकल्प या तरुणाईने केला आहे. यासाठी परळी, कास परिसरातील युवकांनी सोशल नेटवर्किंग ‘सेवार्थ’ नावाने एक साईट ओपन केली आहे. पुणे, मुंबईतील व्यक्तींना ‘एक वही’ देण्याचे आवाहन केले आहे. ‘वही आमची भविष्य त्यांचे,’ अशी ही संकल्पना आहे. परळी भागातील केळवली, बनघर, कुस बुदु्रक तसेच कास पठरावरील एकीव, सावरी, आरेदरे तसेच कऱ्हाड येथील मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी असलेले युवक एकत्र आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. सर्वांनी शाळेत जावे म्हणून शासनही अनेक स्तरावर वेगवेगळे प्रयत्न करीत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते; परंतु यामध्ये वह्यांचा समावेश नाही; पण शिक्षणासाठी वही महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही ही कल्पना राबवत आहोत, असे या युवकांचे म्हणणे आहे.विनोद केरेकर यांनी सांगितले, ग्रामीण भागातील मुलांच्या आई-वडिलांची आपल्या मुलांनी खूप शिकावं, अशी अपेक्षा असते. त्यासाठी कष्ट करून शैक्षणिक साहित्य घेतले जाते; पण काहीना परिस्थितीमुळे हे साहित्य घेता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या नशिबी फक्त पाटी अन् पेन्सिल येते. त्यांनाही इतरांप्रमाणे चांगल्या वह्या का मिळू नयेत? यातून आम्ही वही आपली भवितव्य त्यांचे ही संकल्पना राबविण्याचा संकल्प केला आहे.
बाजारभावाप्रमाणे एका वहीची किंमत सरासरी २० रुपये इतकी आहे. विद्यार्थ्यांस शालेय वर्षांत कमीत कमी एक डझन वही लागतात. त्यामुळे २५० ते ३०० रुपये खर्च येतो. डोंगराळ व दुर्गम भागातील लोकांना उत्पन्नाचे साधन शेती आहे. घरखर्च भागवून मुलांचे शिक्षणाचा खर्च करणे त्यांना अशक्य आहे. महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु आई-वडील कोठूनही, काहीही करूनही मुलांनी शिकावे, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. तर अनेकांची परिस्थिती नसल्याने त्यांनी शिक्षण सोडले आहे.
या सर्व परिस्थितीचा अभ्यास करूनच आम्ही सुमारे दहा जणांनी सोशल मीडियावर ‘सेवार्थ’ नावाने साईट ओपन केली आहे. सुमारे २० हजार वह्यांचे संकलन करणार आहे.
या वह्यांसाठी परळी, कास, ठोसेघर, कऱ्हाड भागातील काही शाळांची निवड करण्यात आली आहे. तेथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. दानशूर व्यक्तीनींही मदत करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. (वार्ताहर)

१० मे पर्यंत वह्या जमा....
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतिनिमित्त ‘वही आपली, भविष्य त्यांचे,’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये १० मे पर्यंत वह्या जमा करण्यात येणार आहेत. जमा झालेल्या वह्या १० जूनपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी परळी, ठोसेघर, कास, कऱ्हाड भागातील आदी शाळांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच जास्त वह्या जमा झाल्यास इतर शाळांतही वह्या देण्यात येणार आहेत.


डोंगराळ भागात ज्याठिकाणी विद्यार्थ्यांना मैलान्मैल पायी शाळेत जावे लागते. तसेच माळीण येथील शाळेमध्ये किती मुलं शिकतात, त्यांच्या शिक्षणाचं काय? याची माहिती घेतली आहे. या संकल्पनेतून त्यांनाही वह्या देण्यात येणार आहेत. आमच्या भागातील कोणतीही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत.
-विनोद केरेकर, युवक-केळवली

Web Title: That's ours; Future theirs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.