ठळक मुद्देसातारा तहसीलदारांची शिष्टाई जळकेवाडी ग्रामस्थांचे उपोषण मागेरस्त्याबाबत सामोपचाराने निघाला तोडगा

सातारा  , दि. २६ : तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या  जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे.


गावात जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या मागणीसाठी जळकेवाडी (वरची), ता. सातारा येथील ग्रामस्थांनी मंगळवार (दि.२४ आॅक्टोबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले होते. धावली फाटा ते जळकेवाडी हा रस्ता ७० ते ८० वर्षांपासून अस्तित्वात आहे. परंतु सध्याच्या रस्त्यावर जुंगटी ग्रामस्थांनी ६ फूट उंचीचा बांध घातला आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे, असा आरोप जळकेवाडी ग्रामस्थांनी केला होता.

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग, तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही जुंगटी ग्रामस्थांनी बेकायदा रस्त्यावरील खडी जेसीबीने काढली आहेत. हा रस्ता बंद झाल्याने जळकेवाडी ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता.


रस्त्यावरून या दोन गावांत प्रचंड तणाव होता. जळकेवाडीला जाणारा रस्ता जुंगटी गावच्या हद्दीतून जातो. मात्र, ५०० मीटरच्या अंतरात जुंगटी गावच्या शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. रस्त्यासाठी जमीन दिली गेल्यास शेताचे दोन तुकडे पडतात, तसेच आधीच कमी शेती क्षेत्र असताना रस्त्यासाठी जमीन दिली गेल्यास अत्यंत तुटपुंजी जमीन कसण्यासाठी राहणार, असे जुंगटी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे होेते.


साताºयाचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी याबाबत दोन्ही गावांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही गावांतील लोकांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. पूर्वी खेडेगावांमध्ये रस्ते दिले गेलेत त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन आनंदाने दिली आहे.

रस्ता नसल्याने अनेक समस्या उभ्या राहतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन संकट उभे राहिल्यास रस्ता नसेल तर संबंधित गावकऱ्यांनी जायचे कुठून? रस्ता ही गरजेची बाब असल्याने जुंगटी ग्रामस्थांनी अडून न राहता रस्त्यासाठी जागा द्यावी, असे तहसीलदारांनी सूचविले.

शेतामधून जाणारा रस्ता गहू पेरल्यानंतर बंद होणार आहे. त्याआधीच रस्त्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यावर शेताच्या कडेने रस्ता देण्याचे या ग्रामस्थांनी मान्य केले. तसेच १०० रुपयांच्या स्टँपवरही या शेतकऱ्यांनी सह्या करून रस्त्याची अडवणूक करणार नसल्याचे लिहून दिल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. रस्त्याबाबत तोडगा निघाल्याने जळकेवाडी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत गुरुवारी उपोषण मागे घेतले.


जळकेवाडीला जाणारा रस्ता जुंगटी गावच्या शेतातून जातो. शेतामध्ये पेरणी केल्यास जळकेवाडीच्या ग्रामस्थांची अडचण निर्माण होत होती. या समस्येवर सामोपचाराने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गावांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा केली. शेताच्या कडेने रस्ता तयार करण्यास जुंगटी ग्रामस्थांनी तयारी दाखविल्याने या दोन गावांतील तणाव दूर होण्यास मदत झाली आहे.
- नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार