नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:57 PM2019-05-13T23:57:47+5:302019-05-13T23:57:52+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे; परंतु ...

Start water tankers in river banks: Chief Minister's instructions | नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नदी असलेल्या गावांमध्येही पाण्याचे टँकर सुरू करा : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next

सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाययोजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. गावातून नदी गेली आहे; परंतु त्याला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनास दिले. कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी आॅडिओ ब्रीजच्या प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने माण-दहिवडी, खटाव, फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी सुमारे वीस सरपंचांशी मुख्यमंत्री यांनी मोबाईलद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.
पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे
पाणी पुरवठा योजनांना नियमित विद्युत पुरवठा होईल, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठ्यास प्राधान्य द्यावे. तलाव अथवा पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणी अन्य बाबींसाठी पाण्याची मोटार लावू देऊ नये, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
‘रोहयो’अंतर्गत जिल्ह्यात ३८५ कामे सुरू
जिल्ह्यातील अकरापैकी माण, कोरेगाव, फलटण या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमधील १८३ गावे व ७७० वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण २१९ टँकर सुरू आहेत. सर्वाधिक माण तालुक्यात १०७ तर सर्वांत कमी सातारा तालुक्यात एक टँकर सुरू आहेत.

Web Title: Start water tankers in river banks: Chief Minister's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.