राष्ट्रवादीच्या आक्रमकतेवर पालकमंत्र्यांचा ‘कंट्रोल’!

By admin | Published: April 24, 2017 11:21 PM2017-04-24T23:21:04+5:302017-04-24T23:21:04+5:30

जोरदार खडाजंगी : आमदारांना बोलण्याची परवानगी नाकारली; ‘जलयुक्त’साठी राज्य शासन देणार निधी

Guardian Minister's control on NCP's aggression! | राष्ट्रवादीच्या आक्रमकतेवर पालकमंत्र्यांचा ‘कंट्रोल’!

राष्ट्रवादीच्या आक्रमकतेवर पालकमंत्र्यांचा ‘कंट्रोल’!

Next

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी भलताच गहजब झाला. भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर
यांची राष्ट्रवादीच्या आमदारांशी शाब्दिक चकमक उडाली. सदस्यांच्या या आक्रमकतेमुळे नियोजन भवनातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. उठलेल्या गदारोळात पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला.
जिल्हा नियोजन आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी पी. बी. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह आमदार व सदस्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील कृषिपंपांच्या वीज जोडण्यांचा प्रश्न या बैठकीतही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उचलून धरला. विदर्भ-मराठवाड्यात कृषिपंपांच्या वीज जोडण्या केल्या जात आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यात २०१३ पासून एका शेतकऱ्याला मागणी करूनही कृषिपंपाची वीज जोडली नाही, असा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर ‘मी स्वत: ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलो, त्यांनी पूर्वीच्या जीआरला स्थगिती दिली आहे,’ असे स्पष्टीकरण माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केले. डॉ. येळगावकर यांनी केलेले स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या आमदारांना खटकले.
‘येळगावकर तुम्ही थांबा...,’ असं म्हणत फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी येळगावकरांना सूचना केली. या सूचनेमुळे डॉ. येळगावकर अधिकच भडकले. ‘तुम्ही आवाज वाढवू नका, अध्यक्षांच्या परवानगीने मी बोलतोय. मला थांबा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,’ असा प्रश्न येळगावकरांनी विचारल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच भडकले. आमदार शशिकांत शिंदे व येळगावकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा शाब्दिक वाद सुरू असतानाच आमदार दीपक चव्हाण बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पालकमंत्र्यांनी थांबवले. ‘मी तुम्हाला बोलण्याची परवानगी देत नाही, विषय संपला,’ असं म्हणत पालकमंत्र्यांनी आमदार चव्हाण यांना रोखले.
यानंतर माईकचा ताबा घेत पालकमंत्र्यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी कृषिपंपांच्या वीज जोडणीबाबत चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी भरून घेतल्यानंतर वीज जोड देता येतील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे पालकमंत्री म्हणाले. त्यावर ‘सातारा जिल्ह्यात कृषिपंपांचे वीजबिल ९५ टक्के शेतकऱ्यांनी वेळेत भरलेले आहे,’ असा आक्षेप आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतला.
जिल्ह्यात किती शेतकऱ्यांंना
वीज जोड हवेत, याची माहिती घेऊन पुढील आठवड्यात पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत सर्व आमदारांची
बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिवतारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

२४३.६५ कोटींच्या आराखड्याला मंजुरी
सातारा जिल्ह्याच्या २४३.६५ कोटी रुपयांच्या नियोजन आराखड्याला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेसाठी लागणारा निधी या आराखड्यात समाविष्ट नाही. तो निधी राज्य शासनामार्फत वेगळा मिळणार असल्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.


जिल्हा नियोजन
समिती बैठक

Web Title: Guardian Minister's control on NCP's aggression!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.