पक्ष अन् चिन्ह मिळालं, लागा निवडणूक तयारीला; अजित पवार यांचा आदेश

By नितीन काळेल | Published: February 15, 2024 08:27 PM2024-02-15T20:27:57+5:302024-02-15T20:28:36+5:30

मुंबईत साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक; ३ मार्चला मेळावा 

got the party and the symbol now started preparing for the election ncp dcm ajit pawar order | पक्ष अन् चिन्ह मिळालं, लागा निवडणूक तयारीला; अजित पवार यांचा आदेश

पक्ष अन् चिन्ह मिळालं, लागा निवडणूक तयारीला; अजित पवार यांचा आदेश

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल बाजुने लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी साताऱ्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत पक्षवाढ, संघटनात्मक बांधणीबरोबरच लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे फर्माने सोडले. तसेच पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने ३ मार्चला साताऱ्यात मेळावा घेण्याचेही निश्चीत केले. त्यामुळे राष्ट्रवादीचा दादा गट निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्याबरोबर एक गट भाजपबरोबर गेला. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. तर इतर आठ आमदारांना मंत्रिपद देण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होती. निवडणूक आयोगानंतर आता विधानसभा अध्यक्षांनीही अजित पवार यांचीच राष्ट्रवादी असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील अजित पवार गटात आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारीच मुंबईत प्रदेश कार्यालयात साताऱ्यातील पक्षाचे आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मार्गदर्शनही केले.

मुंबईतील या बैठकीला साताऱ्यातील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष आणि पक्षाचे चिन्हही आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करा. पक्षबांधणी महत्वाची आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सातारा आणि माढा मतदारसंघातही ताकद वाढवा, असेही फर्माने अजित पवार यांनी सोडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट तयारीला लागणार आहे.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा बॅंक संचालक राजेंद्र राजपुरे, कृषी समितीचे माजी सभापती शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, शिवाजीराव महाडिक, जितेंद्र डुबल, मनोज पोळ, संजय देसाई, राजाभाऊ उंडाळकर, संजय गायकवाड, साधू चिकणे, बाळासाहेब बाबर, शशिकांत वाईकर आदी उपस्थित होते.

पक्षाचा प्रथमच होणार मेळावा...

सहा महिन्यांपूर्वी अजित पवार महायुतीत जाऊन उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अनेकवेळा अजित पवार जिल्ह्यात आले. पण, नियोजित कार्यक्रम सोडून काहीच झाले नाही. पण, आता पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा साताऱ्यात घेण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. त्यानुसार ३ मार्चला हा मेळावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेण्याबाबतही स्पष्ट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 

Web Title: got the party and the symbol now started preparing for the election ncp dcm ajit pawar order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.