पांडवगडावर ट्रेकर्सची रोमांचक कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:24 AM2017-11-15T00:24:28+5:302017-11-15T00:25:56+5:30

Exciting exercise of trekkers on Pandavgarh | पांडवगडावर ट्रेकर्सची रोमांचक कसरत

पांडवगडावर ट्रेकर्सची रोमांचक कसरत

Next


बावधन : वाई तालुक्यातील निसर्गसौंदर्य लाभलेल्या व कठीण अशा पांडवगडावर योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकच्या वतीने रॅपलिंग मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणारा १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला व ही मोहीम यशस्वी केली.
वाई नगरीला अनेक डोंगरांचा निसर्गरम्य वेढा पडलेला आहे. डोंगराच्या या वेढ्यात पांडवगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड, सोनजाई अशी अनेक दुर्गरत्ने पाहायला मिळतात. वाईच्या जवळ असणारी दुर्गशिखरे माना वर काढून डोकावत असतात. त्यातच विशिष्ठ आकाराने उठून दिसतो तो पांडवगड.
या गडाच्या दोन बाजूने असणारा व काळजात धडकी भरवणारा भव्यदिव्य कातळकडा, मधमाशांचे पोळे व सरपटणाºया जीवांचे भय ते वेगळेच. त्यामुळे इकडे फक्त साहसी ट्रेकर्सच येतात.
परंतु पांडवगडचा प्रवास कठीण असला तरी मात्र या प्रवासात निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळते. याच पांडवगडावरती योद्धा प्रतिष्ठान अ‍ॅडव्हेंचर ट्रेकचे तज्ज्ञ प्रशिक्षक रणवीर गायकवाड, तुषार घोरपडे, अक्षय पवार यांच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. गिर्यारोहण क्रीडा प्रकारातील साहसी समजल्या जाणाºया रॅपलिंगची मोहीम घेण्यात आली.
यामध्ये योद्धा प्रतिष्ठानचे सदस्य सूरज घोरपडे, प्रसाद भोसले, आनंद पवार, संकेत मराठे, सत्यजित आमराळे, अथर्व यादव, दिलीप रवळेकर, गणेश मराठे, जयदीप कांबळे, रोहित भोसले, सोहम घोरपडे, सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेऊन ही मोहीम पूर्ण केली.
सातारा, वाई व गंगापुरी या भागातून १२ ते ५२ वर्षांच्या ३० ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता. गडावरील वाईच्या दिशेकडून दिसणाºया १५० फूट उंचीचा चित्तथरारक असा हा कातळकडा रोपच्या साह्याने सर्वांनी रॅपलिंग करत खाली उतरला. काहीजणांसाठी रॅपलिंगचा अनुभव नवीनच होता. तरीही योद्धा प्रतिष्ठानच्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इच्छाशक्तीच्या जोरावर तो सर्वांनी यशस्वी करून दाखविला. त्यांचे कौतुक होत आहे.
पाच हजार फूट उंचीच्या गडावर मोहीम
गेल्या दोन वर्षांत या प्रतिष्ठानच्या माध्यमातून १२५ मोहिमा यशस्वी करण्यात आल्या असून, महाराष्ट्रातील ६५ गडकिल्ले पालथे घातले आहेत. योद्धा प्रतिष्ठानने नाशिकच्या आलंग, मदन, कुलन या महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाºया पाच हजार फूट उंचीच्या गडावर नुकतीच रॅपलिंगची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यापुढे ही अशीच उंच-उंच गडांवर योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने मोहिमा राबविण्यात येणार आहेत, असे रणवीर गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Exciting exercise of trekkers on Pandavgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.