ठळक मुद्देशनिवारी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन तत्कालीन गुरुजनांचाही होणार सत्कारजुन्या आठवणींना उजाळा मिळणार

सायगाव ,दि. २५ :  मेढा येथील प्राथमिक शाळेत १९७१ ते ७८ च्या दरम्यान शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी दि. २८ रोजी दुपारी दोन वाजता मेढा येथील यशोदीप मंगल कार्यालयात कृतज्ञता सोहळा व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सोमनाथ काशिळकर यांनी दिली.


मेढा येथील प्राथमिक शाळेत १९७१ ते ७८ दरम्यान शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याला घडविले, अशा गुरुजनांचा सत्कार व विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. दि. २८ रोजी दुपारी दोन वाजता मेढा येथे हा कार्यक्रम होत आहे.


१९७१ मध्ये मेढा प्राथमिक केंद्र शाळेत पहिलीत शिक्षण घेण्यासाठी दाखल झालेले विद्यार्थी नामदेव बांदल, संजय पवार, महेंद्र साळुंखे, महेश निकम, शिवाजी सातपुते, आत्ताफ अत्तार, सुनील धनावडे, रघुनाथ चिकणे, दिलीप वांगडे हे विद्यार्थी अनेक वर्षांनंतर एकत्र आले.

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मग आपल्याला शिकविणाऱ्या  गुरुजींची आठवण झालेल्या या मंडळींनी या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. त्यानुसार सर्व शिक्षकांना संपर्क साधण्यात आला. या कार्यक्रमात तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही काशिळकर यांनी केले आहे.