८१ वर्षाच्या माजी सैनिकाने एका एकरात घेतले १० लाखाचे उच्चांकी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:08 PM2018-12-27T12:08:28+5:302018-12-27T12:10:38+5:30

यशकथा : वयाच्या ८१ व्या वषीर्ही त्यांची शेतात राबायची तयारी हे खरोखरच तरुणांना दिशादर्शकच आहे.

The 81-year-old ex-soldier's earning of 10 lakhs in one acre land | ८१ वर्षाच्या माजी सैनिकाने एका एकरात घेतले १० लाखाचे उच्चांकी उत्पन्न

८१ वर्षाच्या माजी सैनिकाने एका एकरात घेतले १० लाखाचे उच्चांकी उत्पन्न

- साहील शहा  ( सातारा) 

कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न काढणारे अनेक जण असतात; पण वयाच्या ८१ व्या वर्षीही शेतीत तरुणांना लाजवेल असे काम  कोरेगाव तालुक्यातील धामणेरमधील माजी सैनिक नामदेव महादेव माने करीत आहेत. त्यांनी आपल्या एक एकरातील अद्रक शेतात उसाचे आंतरपीक घेऊन १४ महिन्यांत दहा लाखांहून अधिक उच्चांकी उत्पादन घेतले आहे, तसेच ३० टन आले पिकाचेही उत्पन्न मिळविले आहे. 

सैनिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर नामदेव माने यांनी खासगी नोकरी सांभाळत शेती केली. शेतात विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच नियोजन करून पिकाची काळजी घेतली. जमिनीतील बुरशीचे प्रमाण पूर्णपणे कमी करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला रोटाव्हेटर फिरविले. नंतर तागाची लागवड केली. अडीच महिन्यांनी फुले लागल्यानंतर संपूर्ण ताग जमिनीत गाडून टाकला, तसेच दोन ट्रॉली शेणखत टाकले. यानंतर रान चांगले तापू दिले. पुन्हा जमिनीत रोटाव्हेटर फिरविला. नंतर सव्वाचार फुटी बेड तयार करून घेतला. जून २०१७ मध्ये औरंगाबादी जातीच्या अद्रकाची बियाण्यासाठी निवड केली. 

अद्रक उगवून आल्यानंतर पहिल्या महिन्यात तीन आळवण्या केल्या. योग्य प्रमाणात पाणी व खतांची मात्रा मिळण्यासाठी ड्रीपचा वापर केला. पावसाळ्यामध्ये एकदा बुरशीनाशक ड्रीपमधून दिले, तसेच किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पंपाला १५० मिली देशी गायीचे गोमूत्र फवारणी केली. पिकाच्या सरीमध्ये उसाची लागण केली. मार्च ते एप्रिलमध्ये आले काढणीयोग्य झाले. यामध्ये गुंठ्याला सव्वागाडी याप्रमाणे ६० गाड्या म्हणजे ३० टन, असे अद्रकाचे विक्रमी उत्पादन माने घेतले, तसेच उसाचे ८५ टन उत्पन्न मिळाले आहे.  

नामदेव माने यांनी उच्चांकी उत्पादन घेताना रासायनिक खतांचा अत्यल्प वापर केला आहे. जास्तीत जास्त जैविक व स्वत: तयार केलेल्या खतांचाच वापर करून त्यांनी उच्चांकी उत्पादन घेतले आहे, तसेच २५ लिटर जिवामृत तयार करण्यासाठी देशी गायीचे ५ किलो शेण, ५ लिटर गोमूत्र, १ लिटर तूप, अर्धा लिटर दही किंवा ताक, २ किलो खपली पेंड (शेंगाची, हरभरा डाळीचे पीठ २ किलो व केमिकल नसलेला गूळ २ किलो एवढे साहित्य लागते. हे साहित्य एकत्रित करून १० ते १५ दिवस हवाबंद बॅरल अथवा कॅनमध्ये ठेवले जाते. यानंतर हे जिवामृत पिकांना वापरण्यायोग्य होते. ड्रीपमधून एकरी ३ लिटर या प्रमाणात हे मिश्रण दिले जाते. याचाही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा झाल्याचे माने यांनी स्पष्ट केले. 

वयाच्या ८१ व्या वषीर्ही त्यांची शेतात राबायची तयारी हे खरोखरच तरुणांना दिशादर्शकच आहे. परिसरातील अनेक शेतकरी आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करताना दिसत आहेत. एकूणच नामदेव माने यांची जिद्द, अविरत काम करण्याची सचोटी यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यात ते अग्रेसर झाले आहेत. सैनिक बनून देशसेवेनंतर खासगी नोकरी करीत त्यांनी शेतीतही आपल्या यशस्वीतेचा झेंडा गाडला आहे.

Web Title: The 81-year-old ex-soldier's earning of 10 lakhs in one acre land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.