राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन!, ४ साखर कारखाने बंद; ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 02:20 PM2024-02-20T14:20:37+5:302024-02-20T14:20:57+5:30

गाळप, उत्पादन, उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर 

776 lakh 87 quintal sugar production in the state, The sugarcane crushing season is nearing its final stage | राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन!, ४ साखर कारखाने बंद; ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे 

राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन!, ४ साखर कारखाने बंद; ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे 

संतोष धुमाळ

पिंपोडे बुद्रुक : राज्यातील ऊस गाळप हंगामाची वाटचाल अंतिम टप्प्याकडे सुरू आहे. सद्य:स्थितीत ७९० लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे. चालू वर्षी राज्यात १०३ सहकारी व १०४ खासगी मिळून २०७ कारखान्यांकडून साखर उत्पादन सुरू होते. त्यापैकी ४ साखर कारखाने बंद झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातील अधिकारी शंकर पवार यांनी दिली.

सद्य:स्थितीत राज्यात ९ लाख ४६ हजार ६५० मेट्रिक टन याप्रमाणे उसाचे रोजचे गाळप होत आहे. चालूवर्षी ऐन पावसाळी हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने उसाची किमान वाढ न झाल्याने उसाचे पर्यायाने साखरेचे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात कारखानदारांकडून उपलब्ध उसाच्या गाळपासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात ऊस गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. अंतिम टप्प्यात जास्तीत जास्त ऊस गाळप करून अपेक्षित साखर उत्पादन करण्याच्या दृष्टीने ऊसतोडणीचे नियोजन करून कारखान्यांकडून गाळप सुरू आहे.

गतवर्ष २०२२-२३ च्या हंगामात १३ फेब्रुवारी अखेर २०७ कारखाने सुरू होते. त्यांनी ८६५ लाख ९६ हजार टनांइतके ऊस गाळप पूर्ण केले होते. तर ९.८३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ७७६ लाख ८७ हजार क्विंटल इतके साखर उत्पादन झाले होते. याचा तुलनात्मक विचार करता चालूवर्षी ऊस गाळप संथगतीने सुरू असून, साखर उत्पादनात घट झाल्याचे चित्र आहे.

गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी..

१३ फेब्रुवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर विभागात ४० कारखान्यांद्वारे १८० लाख ५४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे, तर सरासरी ११.१७ टक्के उताऱ्यासह २०१ लाख ६५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करीत कोल्हापूर विभागाने गाळप, उत्पादन व उताऱ्यात आघाडी घेतली आहे.

पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साखर उताऱ्यात पर्यायाने साखर उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपेक्षित ऊस गाळप करून साखर उत्पादन करण्याचे मोठे आव्हान साखर कारखान्यांपुढे उभे आहे. - जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, गुरू कमॉडिटी (जरंडेश्वर) कारखाना..

राज्यातील विभागनिहाय १३ फेब्रुवारीअखेर ऊस गाळप, साखर उत्पादन व उतारा

विभाग- ऊस गाळप (लाख मे.टन) - साखर उत्पादन (लाख क्विंटल) - उतारा (टक्के)

कोल्हापूर - १८०.५४ - २०१.६५ - ११.१७
पुणे - १६९.३२ - १७१.०५ - १०.१
सोलापूर - १६८.७८ - १५२.१९ - ९.०२
अहमदनगर - ९९.८२ - ९४.९८ - ९.५२
छत्रपती संभाजीनगर - ७४.१८ - ६३.०१ - ८.४९
नांदेड - ८८.१७ - ८६.०८ - ९.७६
अमरावती - ७.३५ - ६.६८ - ९.०९
नागपूर - २.४९ - १.२३ - ४.९४.

Web Title: 776 lakh 87 quintal sugar production in the state, The sugarcane crushing season is nearing its final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.