जिल्हा परिषद सदस्यांची विधानसभेसाठी तयारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:23 PM2018-02-11T23:23:57+5:302018-02-11T23:24:02+5:30

Zilla Parishad members are preparing for the Legislative Assembly ... | जिल्हा परिषद सदस्यांची विधानसभेसाठी तयारी...

जिल्हा परिषद सदस्यांची विधानसभेसाठी तयारी...

Next

अशोक डोंबाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मंत्रालयात पोहोचण्याची पायरी म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. सांगली जिल्हा परिषदेतून आजवर १६ सदस्य संसद-विधिमंडळात पोहोचले आहेत. आता पाच विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची चाचपणी चालू असल्यामुळे इच्छुकांनी वर्षभर आधीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत. पण, त्यांच्या समर्थकांनी पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपच्या एका गटाने संग्रामसिंह यांचे नाव लोकसभेसाठीही चर्चेत आणले आहे. त्यांचा सर्वच पक्षांमध्ये मोठा मित्रपरिवार आहे. भाजपमध्येही त्यांचे सर्वच गटांशी चांगले संबंध आहेत. सध्या त्यांच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासह लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी भेटी-गाठी चालू आहेत. विकास कामांच्या माध्यमातून ते लोकांच्या संपर्कात आहेत.
उमदी (ता. जत) जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले विक्रम सावंत यांनी मागील विधानसभा निवडणूक लढविली आहे. त्यांचा निसटता पराभव झाल्यामुळे ते जिल्हा परिषदेत आले आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणीला लागले आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्याची झलक दिसून आली आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य सत्यजित देशमुख यांनीही शिराळा विधानसभा मतदारसंघातून मागील निवडणूक लढविली आहे. सध्या ते जिल्हा परिषदेत असले तरीही त्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात नव्याने मोर्चेबांधणी चालू आहे. विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. मागील निवडणुकीतील चुका दुरुस्त करून मिनी मंत्रालयातून मंत्रालयात पोहोचण्यासाठी ते सध्या रणनीती आखत आहेत.
सलग तीनवेळा जिल्हा परिषदेत निवडून येऊन शिवाजी डोंगरे यांनी हॅट्ट्रिक केली आहे. त्यांच्याकडे माधवनगर, बुधगाव, बिसूर, कवलापूर परिसरात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. या जोरावर भाजपकडून बुधगाव मतदारसंघातून पत्नी विद्या डोंगरे आणि कवलापूर जिल्हा परिषद गटातून स्वत: शिवाजी डोंगरे निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांनीच त्यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह धरला आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची तयारी पाहता, शिवाजी डोंगरे निवडणूक लढविणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोंगरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र विधानसभेच्यादृष्टीने कार्यकर्ते आणि जनतेशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
बोरगाव (ता. वाळवा) जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांनीही मागील इस्लामपूर विधानसभा निवडणूक लढविली आहे. पुन्हा त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे. ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांनी इस्लामपूर विधानसभा लढविण्यासाठी त्यांच्याकडे आतापासूनच आग्रह धरला आहे.
परंपरा झेडपीची : राज्यात झळकण्याची
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये राजकारणाची सुरुवात करणाºया सोळाजणांना पुढे आमदारकीची संधी मिळाली. त्यातील चौघे मंत्री झाले, जिल्हा परिषदेतून आलेले माजी मंत्री शिवाजीराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्य पातळीवर कामाचा ठसा उमटविला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर सध्या कार्यरत आहेत. या ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल टाकत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनीही विधानसभा, लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Zilla Parishad members are preparing for the Legislative Assembly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.