विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:53 AM2024-03-16T11:53:25+5:302024-03-16T11:53:58+5:30

भाजपच्या नेत्यांनी पक्षातील नेते, कार्यकर्त्यांवर उमेदवारी लादली

Vishwajit Kadam, Jayant Patil Settlement with Sanjay Kaka; Criticism of former BJP MLA Vilasrao Jagtap | विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

विश्वजित कदम, जयंत पाटील यांची संजयकाकांबरोबर ‘सेटलमेंट’; भाजपच्या माजी आमदाराची टीका 

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांना जिल्ह्यात तिसरे नेतृत्वच निर्माण होऊ द्यायचे नाही. म्हणूनच ते नेहमी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याबरोबर सेटलमेंटचे राजकारण करीत आहेत, अशी टीका भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. तसेच सर्वेक्षण, जनमत चाचणीतही संजय पाटील उमेदवारीला विरोध होता, तरीही भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची उमेदवारी कार्यकर्ते आणि नेत्यांवर लादली आहे, असाही त्यांनी आरोप केला.

विलासराव जगताप म्हणाले, जयंत पाटील आणि डॉ. विश्वजित कदम राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात सक्षम आहेत. या दोन नेत्यांनी ठरविले तर जिल्ह्यात भाजपच्या उमेदवाराला तुल्यबळ उमेदवार देऊ शकतात, पण पाटील आणि कदम यांना राजकारणात तिसरा पर्यायच निर्माण करायचा नाही. म्हणूनच ते भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी सेटलमेंटचे राजकारण करून त्यांना निवडून आणत आहेत.

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. डॉ. विश्वजित कदम यांचेही काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. असे असतानाही त्यांना सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला सोडावी लागत आहे. काँग्रेससाठी उमेदवारी मिळवता येत नाही, ही गोष्ट मतदारांच्या डोळ्यात धूळफेक केल्याप्रमाणे आहे. मतदारांनी नेत्यांचा सेटलमेंटचा उद्योग बंद पाडण्यासाठी डोळसपणे मतदान करण्याची गरज आहे, असेही त्यांनी मतदारांना आवाहन केले.

दुष्काळी फोरमशी चर्चा करून निर्णय घेणार

दुष्काळी फोरममधील सर्वच नेत्यांनी संजय पाटील यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. सध्या कोणीही स्पष्ट बोलत नसले तरी मतदानातून ते दाखवून देतील. अन्य कोणत्या उमेदवाराला मदत करायची, याबद्दलचा निर्णय दुष्काळी फोरमच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, असेही जगताप म्हणाले.

भाजपमध्ये राहूनच संजयकाकांना विरोध

मला सध्या खासदार, आमदार काहीच व्हायचे नाही. भाजपमध्ये राहूनच संजय पाटील यांच्या पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला विरोध करणार आहे. स्पष्ट बोलल्याबद्दल पक्षाने माझ्यावर कारवाई केली तर कुठे जायचे याबाबतची भूमिका योग्यवेळी जाहीर करण्यात येईल, असेही जगताप म्हणाले.

जयंतरावांचा दोनवेळा मुलांसाठीच सर्व्हे

जयंत पाटील यांनी चिरंजीव प्रतीक पाटील यांना सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरविण्यासाठी सर्वेक्षण केले. या ठिकाणी दुसरे नेतृत्व तयार व्हावे, असे त्यांना वाटतच नाही. प्रत्येक ठिकाणी घराणेशाहीचे राजकारण चालू आहे, अशी टीका जगताप यांनी जयंत पाटील यांच्यावर केली.

संजय पाटील यांची प्रत्येकवेळी भाजपशी गद्दारी

भाजपचे खासदार असतानाही संजय पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती पदाधिकारी निवडीवेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी गद्दारी करून राष्ट्रवादीशी तडजोड केली. सांगली बाजार समिती निवडणुकीतही संजय पाटील यांनी भाजपशी गद्दारी केली. तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे, अशी टीका जगताप यांनी केली.

Web Title: Vishwajit Kadam, Jayant Patil Settlement with Sanjay Kaka; Criticism of former BJP MLA Vilasrao Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.