महापालिका बुरुजांच्या डागडुजीचा प्रयत्न : भाजपशी छुप्या संगतीचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:28 PM2018-04-06T23:28:51+5:302018-04-06T23:28:51+5:30

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांनी सांगली

Trying to repair municipal bastions: The result of hidden fellowship with BJP | महापालिका बुरुजांच्या डागडुजीचा प्रयत्न : भाजपशी छुप्या संगतीचा परिणाम

महापालिका बुरुजांच्या डागडुजीचा प्रयत्न : भाजपशी छुप्या संगतीचा परिणाम

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीची ‘हल्लाबोल’मधून पालिका निवडणुकीची तयारी

शीतल पाटील।
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांनी सांगली महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. कधीकाळीचा छुपा मित्रपक्ष असलेल्या भाजपवर सर्वच नेत्यांनी तोंडसुखही घेतले. पण स्वपक्षातील गटबाजीवर मात्र सावध पवित्रा घेत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महापालिका क्षेत्रात पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीची मोठी हवा होती. पण भाजपशी छुप्या संगतीने त्यांचे एकेक बुरूज ढासळले. आता निवडणुकीच्या तोंडावर या बुरुजांची डागडुजी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यात यश आले की नाही, हे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
हल्लाबोल यात्रेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळातील नेते आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर हल्ला चढविला. सांगलीच्या स्टेशन चौकातील सभेत तर केंद्र, राज्यातील भाजप सरकारबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीचा संदर्भ देत भाजपवर टीका करण्यात आली. सर्वच नेत्यांच्या केंद्रस्थानी भाजप होता. पण ही वेळ राष्ट्रवादीवर का आली, याचे आत्मचिंतनही नेत्यांनी करायला हवे. वसंतदादा, राजारामबापूंच्या जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे रुजविण्यात राष्ट्रवादीचाच मोठा हातभार आहे. विशेषत: सांगली महापालिका क्षेत्रातील दोन विधानसभा मतदारसंघ तर भाजप-राष्ट्रवादी हे दोघेही मित्रपक्षच बनले होते. त्यांची युती उघड नसली तरी छुपी होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सांगली-मिरज या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजप उमेदवाराच्या प्रचारात होते. अगदी पक्षाचा उमेदवार असतानाही त्यांच्या प्रभागातील मतदानाची आकडेवारी पाहिल्यास, प्रत्येक ठिकाणी भाजपचा उमेदवार आघाडीवर होता. यामागे काँग्रेसचे हेवीवेट नेते मदन पाटील यांचा पराभव करणे, हाच एकमेव हेतू दिसून आला. त्यासाठी सुरेश पाटील या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बळीचा बकरा बनविण्यात आले. अगदी अजित पवार यांनीच सुरेश पाटील यांची उमेदवारी दिली असतानाही स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून भाजपच्या विजयात हातभार लावला.

त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपशी सलगी वाढली. अनेक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला, तर विद्यमान नगरसेवकांचे भाजपप्रेम दिवसेंदिवस वाढत चालले. त्यातून आता १८ नगरसेवक व ३३ पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. तसे घडल्यास पुन्हा एकदा महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी क्षीण बनणार आहे. हा धोका ओळखूनच आता जयंत पाटील यांच्यापासून सारेच नेते भाजपवर टीका करू लागले आहे.

भाजपप्रेमाच्या भरतीमुळे राष्ट्रवादीचे बुरुज ढासळत गेले. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने या बुरुजांची डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा वादही पेटला आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यात समेट कसा घडणार, यावरच राष्ट्रवादीचे मरगळलेले कार्यकर्ते रिचार्ज होणार की नाही, हे ठरणार आहे.

काँग्रेसशी आघाडी, की स्वबळावर?
महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे नेतृत्वाची वानवा आहे. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या निधनाने काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी आहे. त्यात राष्ट्रवादीची पडझड होत आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसला एकमेकाशी मिळतीजुळती भूमिका घ्यावी लागणार आहे. दोन्ही पक्षात आघाडी झाल्यास त्याचे नेतृत्व आपसुकच आमदार जयंत पाटील यांच्याकडेच येईल. पण हा निर्णय दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करावा लागेल. अन्यथा ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध करावी लागण्याची शक्यताही आहे.

पोस्टरवरून गटबाजी
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेवेळी स्टेशन चौकातील पोस्टरवरून कमलाकर पाटील यांना वगळले होते. इतर तालुक्याच्या ठिकाणी झालेल्या सभेत मात्र तेथील नेत्यांची छायाचित्रे होती. यावरून कमलाकर पाटील गट नाराज झाला असून त्याचे खापर संजय बजाज यांच्यावर फोडले जात आहे

पक्षातील अनेकजण : कुंपणावर
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक भाजपच्या कुंपणावर आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजताच ते भाजपमध्ये उडी मारणार असल्याची चर्चा आहे. काहींनी तर भाजपशी गुप्त चर्चा करून आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबही केले आहे, तर काहीजण अद्याप चर्चेच्या फेऱ्यात आहेत. बुधवारच्या हल्लाबोल यात्रेच्या स्टेशन चौकातील सभेवेळी हे कुंपणावरील नगरसेवकही उपस्थित होते. अगदी व्यासपीठावर बसले होते. पण त्यांच्याबद्दल खुद्द राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच संशय आहे. अशा कुंपणावरील नगरसेवकांचे काय करणार, त्यांचा ऐनवेळी भाजपप्रवेश झाल्यास त्यांना पर्याय काय असणार, याचाही विचार पक्षाला करावा लागेल.

Web Title: Trying to repair municipal bastions: The result of hidden fellowship with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.