विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! दप्तरांचे ओझे होणार कमी

By अशोक डोंबाळे | Published: June 9, 2023 07:10 PM2023-06-09T19:10:06+5:302023-06-09T19:10:28+5:30

ओझे कमी करण्याबाबत होती मतमतांतरे

The burden of books on the back of the students will be lightened | विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! दप्तरांचे ओझे होणार कमी

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! दप्तरांचे ओझे होणार कमी

googlenewsNext

सांगली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व विषयांचे एकच पुस्तक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांसाठी १० लाख २५ हजार ४४६ पुस्तकांच्या प्रती मागविल्या होत्या. त्यापैकी सध्या १० लाख ५७७७ पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे हलके झाल्याने मुलांना आता वाकत नव्हे, तर धावत शाळेत जाता येईल.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढल्यामुळे मुले शाळेत जाताना अक्षरश: वाकत जात होती. ओझे कमी करण्याबाबत मतमतांतरे होती. यावर अखेर शिक्षण विभागाने तोडगा काढला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात दि. १५ जूनपासून होणार आहे. या सत्रापासून एकात्मिक पाठ्यपुस्तकाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषय एकाच पुस्तकात देण्यात आले आहेत. सध्या या एकात्मिक पुस्तकांचे वितरण सुरू आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून जिल्ह्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांचा पुरवठा ९८ टक्के झाला असून, त्याचे वितरण तालुकास्तरावर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक मोफत देण्यात येणार आहे.

चार भागांत पुस्तक

एकाच पुस्तकामध्ये सर्व विषय आहेत. त्यामुळे या पुस्तकाचे चार भाग करण्यात आले आहेत. दोन-दोन महिने एका भागाचे पुस्तक न्यायचे, तो भाग संपल्यानंतर दुसऱ्या भागाचे पुस्तक याप्रमाणे एकावेळी एकच पुस्तक न्यावे लागणार आहे.

वह्यांपासूनही झाली सुटका

एकात्मिक पुस्तकात पाठ संपल्यानंतर काही पाने कोरी सोडण्यात आली आहेत. या पुस्तकात गृहपाठ करण्याची व्यवस्था आहे. त्यावरच प्रश्नोत्तरेही लिहिता येणार आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत वह्या नेण्याची गरज राहिलेली नाही.

अध्यायनही चांगल्या पध्दतीने होईल

मुलांना एकच पुस्तक शाळेत न्यावे लागेल. त्यामुळे त्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. शिवाय पुस्तकातच कोरी पाने असल्याने मुलांना नोट्स काढण्याची सवय लागेल. यातून आनंददायी शिक्षण मिळण्यास मदत होणार असून अध्ययनही चांगल्या पद्धतीने होईल, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी मिळाली पुस्तके
तालुका - प्राप्त पुस्तक प्रती

आटपाडी - ५८६१९
जत - २३२८३४
कडेगाव - ५४९५२
खानापूर - ७०५१६
क.महांकाळ - ७१२१७
मिरज - १३७६६३
पलूस - ५८९०५
शिराळा - ५६०६९
तासगाव - १०२९६८
वाळवा - १६२०३४
एकूण - १००५७७७

Web Title: The burden of books on the back of the students will be lightened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.