कापसाच्या साठेबाजीमुळे वस्त्रोद्योग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:12 AM2018-07-04T00:12:54+5:302018-07-04T00:13:00+5:30

Textile crisis due to cotton stockpile | कापसाच्या साठेबाजीमुळे वस्त्रोद्योग संकटात

कापसाच्या साठेबाजीमुळे वस्त्रोद्योग संकटात

googlenewsNext


विटा : देशभरातील वस्त्रोद्योग सध्या काही बड्या मोजक्याच कापूस व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे अडचणीत सापडला आहे. संबंधित व्यापाºयांनी बाजारपेठेत जास्त दरासाठी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. परिणामी, बाजारपेठेत सूत व कापड खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाल्याने कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाºया दोषी कापूस व्यापाºयांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
कापसाच्या पीकपाण्याचे वर्ष आॅक्टोबर ते सप्टेंबर असे मोजले जाते. कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाच्या कॉटन कॉर्पोरेशनच्यावतीने देशातील पाऊस व कापूस लागवड यांचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार प्रत्येक वर्षाचा कापसाचा ताळेबंद मांडून त्यातील देशांतर्गत सूतगिरण्या व इतर कापसाची गरज राखीव ठेवून उर्वरित राहिलेल्या कापसाच्या निर्यातीचा कोटा निश्चित केला जातो. त्यानुसार चालू वर्षातील पहिले आठ ते नऊ महिने म्हणजे मेपर्यंत कापसाची उपलब्धता व दर नैसर्गिक तेजी-मंदी गृहीत धरून स्थिर नियंत्रित व स्थिर राहिले होते.
कापसाच्या ताळेबंदानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी लागणारा कापूस साठा देशात उपलब्ध आहे. परंतु, हा सर्व कापूस केवळ काही मोजके बडे व्यापारी व बहुराष्टÑीय कंपन्यांनी गोदामात साठवून ठेवल्याचे वृत्त आहे. या व्यापाºयांनी संगनमताने गेल्या महिन्यापासून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप सूतगिरण्यांच्या व्यवस्थापन व वस्त्रोद्योजकांनी केला आहे. कारण ४१ ते ४२ हजार खंडी असलेला कापूस सध्या ४७ हजार रुपये खंडीनेही मिळत नाही. त्यामुळे सुताच्या उत्पादन किमतीत २० ते २५ रुपये प्रति किलोस, तर कापडाच्या उत्पादन किमतीत त्याप्रमाणात वाढ झाली. परंतु, कापडाच्या वाढलेल्या उत्पादन किमतीत ग्राहक उपलब्ध न झाल्याने कापडाचे दर वाढले नाहीत. परिणामी नुकसान होत असल्याने यंत्रमागधारकांनी सूत खरेदी बंद केली आहे.
यंत्रमागधारकांनी सूत खरेदी बंद केल्याने बाजारात सुताचा साठा वाढल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुताचा दर १० ते १५ रुपये कमी झाला आहे. त्यामुळे कापड व सूत बाजारात आणखी संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कापड, सूत खरेदी-विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरम्यान, कापूस प्रति खंडीला ५० हजार रुपये झाल्याशिवाय कापूस विक्रीस काढायचाच नाही, असा निर्धार साठेबाजांनी केल्याने कापसाची बाजारात आजही टंचाई आहे. त्यामुळे कापसाचे वाढीव दर, टंचाई व सुताचे घसरलेले दर या दुष्टचक्रात सूतगिरण्या अडकल्या आहेत; तर दुसºया बाजूला सुताचे व कापडाचे दर आणखी कमी होतील का, या विवंचनेमुळे कापड खरेदी-विक्री ठप्प झाली आहे.
परिणामी, केवळ कापसाच्या साठेबाजी व कृत्रिम टंचाईमुळे वस्त्रोद्योग साखळीतील सर्व घटक नुकसानीत आले आहेत व अडचणीत सापडले आहेत. त्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Textile crisis due to cotton stockpile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.