प्रेमदिनी सोन्याच्या पाण्यात न्हाले गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:58 PM2018-02-14T22:58:11+5:302018-02-14T22:58:11+5:30

The rose rose in the water of love and rose | प्रेमदिनी सोन्याच्या पाण्यात न्हाले गुलाब

प्रेमदिनी सोन्याच्या पाण्यात न्हाले गुलाब

Next


सांगली : सोने-चांदी, हिरे-मोती यापेक्षाही हृदयात धडधडणाºया खºया प्रेमाची किंमत कितीतरी पटीने अधिक व अनमोल मानली जाते, मात्र हेच अनमोल प्रेम व्यक्त करण्यासाठी सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टींचा मुलामा आता लावला जात आहे. सांगलीत २४ कॅरेट सोन्याच्या पाण्यात न्हालेले गुलाबपुष्प भेट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला.
फुलांप्रमाणे बहरलेली मने... गुलाब, विविध प्रकारच्या सुंदर भेटवस्तू, भेटकार्ड यांच्या माध्यमातून व्यक्त होणारे प्रेम... भेटीगाठींचे कार्यक्रम अशा वातावरणात सांगलीत बुधवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. एकीकडे प्रेमाचा हा बहर फुलत असताना २५ ते ३० टक्के व्यापारात घट झाल्याने भेटवस्तू व पुष्पविक्रेत्यांची मने थोडी कोमेजल्याचे चित्र दिसत होते. तरीही गेल्या दोन दिवसांपासून थंड असलेल्या फुलांच्या बाजारात अचानक हालचाल झाली आणि फुलांना मागणी वाढली. त्यामुळे विके्रत्यांना थोडा दिलासाही मिळाला.
व्हॅलेंटाईन डेचा सर्वाधिक उत्साह महाविद्यालयीन तरुणाईबरोबरच विवाहित जोडप्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून आला. गुलाबाच्या फुलांना, पुष्पगुच्छला सर्वाधिक मागणी होती. सोन्याचा मुलामा दिलेल्या गुलाब फुलांनी सजलेला ८ हजार रुपयांचा गुच्छ बुधवारी सांगलीतून विक्रीला गेला. नैसर्गिकरित्या बहरलेल्या फुलांना हव्या त्या नैसर्गिक रंगात रंगवून प्रेमदिनाच्या आनंदात अधिक रंग भरण्याकडेही प्रेमिकांचा कल होता. त्यामुळे विविध रंगात सजविलेल्या डच गुलाबांनाही मागणी होती. ४० ते ४५ रुपये प्रतिनग याप्रमाणे बुधवारी अशा रंगीत फुलांची विक्री झाली.
पारंपरिक पद्धतीने एखादी भेटवस्तू किंवा गुलाबाचे फूल देऊन एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करतानाच सोशल मीडियावरील प्रेमालाही भरती आली होती. मोबाईलवरून व्हॅलेंटाईन डेच्या ग्रिटिंग्ज, व्हिडिओ, कविता, शेरोशायरी अशाप्रकारच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असलेल्या बाजारपेठेत बुधवारी व्हॅलेंटाईन डेला अचानक हालचाल झाली. भेटवस्तू, फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती. तरीही सरासरी उलाढालीपेक्षा यंदा २५ ते ३० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चौकट
डच गुलाब हसला, देशी रुसला
व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला दराअभावी रुसलेला डच गुलाब बुधवारी भाव मिळाल्याने फुलला. १५ ते २0 रुपये नगावरून २५ ते ३0 रुपयांपर्यंत त्याला भाव मिळाला. दुसरीकडे देशी गुलाबाकडे प्रेमिकांनी पाठ फिरविल्यामुळे त्याचे दर घसरल्याचे दिसत होते. देशी गुलाब केवळ ७ ते ८ रुपयांना विकला गेला. त्याला मागणीही अत्यंत कमी होती.

किमती पुष्पगुच्छ कसे असते?

सांगलीत बुधवारी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक किंमती पुष्पगुच्छ विकले गेले. त्यांना मागणीही चांगली होती. गुलाबांबरोबरच इटालियन किंवा अन्य परदेशी चॉकलेटसला गुंफून तयार केलेला पुष्पगुच्छही महाग आहे. त्याचबरोबर चॉकलेटस्बरोबर असलेल्या गुलाबांना चोवीस कॅरेट सोन्याचा मुलामा लावलेला असतो. यामध्ये सोन्याचा मुलामा दिलेल्या फुलांच्या संख्येवर त्याची किंमत ठरते.
भेटवस्तूंच्या दुकानातही हालचाल
फुलांबरोबरच भेटवस्तूंच्या दुकानातही बुधवारी हालचाल झाली. खरेदीदारांनी गर्दी केल्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळाला. तरीही फूल व भेटवस्तू विक्रेत्यांच्या मते गेल्या काही वर्षातील सरासरी उलाढालीची तुलना करता २५ ते ३० टक्के घट झाली आहे. यास आॅनलाईन खरेदीकडे वाढलेला कलही कारणीभूत असल्याचे त्यांचे मत आहे.

 

Web Title: The rose rose in the water of love and rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली