ठळक मुद्दे स्थायी सभापती पदावरून संकेतभाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची शक्यताहीही निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांच्या आघाडीचे संकेत

शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनोमीलनाचे सूर निघू लागले आहेत. त्याचा प्रत्यय मंगळवारी स्थायी समिती सभापती निवडणुकीत आला. राष्ट्रवादीने उमेदवार उभा न करता सभापती निवडीत काँग्रेसला ‘बाय’ दिला. एकमेकांचा पैरा फेडत दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांमध्ये समझोता एक्स्प्रेस वेग घेऊ लागली आहे. भविष्यात आघाडी झाली, तर दोन्ही पक्षांना भाजपचे आव्हान पेलावे लागणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढीलवर्षी जून-जुलै महिन्यात होणार आहे.

निवडणुकीला अजून आठ ते दहा महिन्यांचा कालावधी आहे. तत्पूर्वीच महापालिका हद्दीत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. नुकतीच गणेशोत्सव काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी बहुतांश गणेश मंडळांच्या आरतीला हजेरी लावून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. भाजपने वरिष्ठ मंत्र्यांच्या माध्यमातून सातत्याने मेळावे, बैठका घेत वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. या साºया घडामोडीत सत्ताधारी काँग्रेस काहीशी पाठीमागे पडल्याचे दिसून येते.

मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये महापालिका क्षेत्रातील नेतृत्वाची पोकळी जाणवू लागली आहे. त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्याकडे महापालिकेची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यांच्या मदतीला आमदार पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम हे दोघेही असले तरी, श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वाला काहीअंशी मर्यादा पडत आहेत. त्यातून महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट-तट उभे करीत स्वकीयांसमोरच आव्हान उभे केले आहे. त्याला तोंड देत सत्ताधाºयांकडून कसाबसा महापालिकेचा गाडा हाकला जात आहे.
अजूनही महापालिकेत मदन पाटील गटाच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यात विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्यास महापालिकेच्या निवडणुकीची समीकरणेच बदलून जातील, असे गणित मांडले जात आहेत.

राष्ट्रवादीतही सारे आलबेल नाही. शहरात दोन गटात राष्ट्रवादी विभागली गेली आहे. एका गटाचे नेतृत्व संजय बजाज यांच्याकडे, तर दुसºया गटाचे नेतृत्व कमलाकर पाटील यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या डगरीवर हात ठेवला आहे. अशातच महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे, असा मतप्रवाहही कार्यकर्त्यांत आहे. सांगलीतील प्रभाग २२ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांच्या आघाडीचे संकेत मिळत होते.
त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही पोटनिवडणुकीतील मदतीचा पैरा स्थायी सभापती निवडणुकीत फेडला. त्यामुळे काँग्रेसचा सभापती बिनविरोध झाला आहे. त्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक संतोष पाटील, राजेश नाईक, प्रशांत मजलेकर यांनी प्रयत्न केले. जयंत पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत यश मिळविल्यानंतर काँग्रेसकडील एकमेव सत्ताकेंद्र असलेल्या महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची शक्यताही वर्तविली जात आहे.


इच्छुकांना थांबविल्याने नाराजीची चिन्हे
स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीतूनही अनेकजण इच्छुक होते. त्यात मिरजेच्या बसवेश्वर सातपुते यांना संधी मिळाली. काँग्रेसचे दिलीप पाटील, किशोर लाटणे, रोहिणी पाटील हे तिघे इच्छुक नाराज दिसत आहेत. दिलीप पाटील व रोहिणी पाटील यांनी तर अर्ज भरण्यासाठी हजेरीही लावली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीतून महेंद्र सावंत, प्रियंका बंडगरसह तिघे इच्छुक होते. त्यांनाही थांबविण्यात आले. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत सभापती निवडणूक बिनविरोध केली खरी, पण हा निर्णय नगरसेवकांच्या कितपत पचनी पडतो, हे पाहावे लागेल. यातून नगरसेवकांत नाराजी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यात भाजपकडील वाढता कलही दोन्ही पक्षांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू लागला आहे.
 

राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील कलकुटगी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेत ही निवडणूक बिनविरोध केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती निवडीत आम्ही आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही उमेदवार उभा न करण्याचा शब्द दिला. तो त्यांनी पाळला आहे. यानिमित्ताने दोन्ही काँग्रेसने एकेक पाऊल पुढे टाकले आहे. या घडामोडी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचे संकेतच आहेत.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस