२८ लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय डॉक्टर, ‘नीट’साठी वाढले 'इतके' लाख अर्ज 

By अविनाश कोळी | Published: March 18, 2024 02:13 PM2024-03-18T14:13:08+5:302024-03-18T14:13:32+5:30

दाखले बंधनकारक नसल्याने अर्ज वाढले

More than 28 lakh students registered for NEET-UG exam for admission to medical degree courses | २८ लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय डॉक्टर, ‘नीट’साठी वाढले 'इतके' लाख अर्ज 

२८ लाख विद्यार्थ्यांना व्हायचंय डॉक्टर, ‘नीट’साठी वाढले 'इतके' लाख अर्ज 

अविनाश कोळी

सांगली : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता देशपातळीवर होणाऱ्या ‘नीट-युजी २०२४’ या परीक्षेकरिता २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही आजपर्यंतची विक्रमी नोंदणी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सव्वासात लाख विद्यार्थी वाढले आहेत. वैद्यकीय शिक्षणातील स्पर्धा प्रत्येक वर्षी वाढत आहे.

‘नीट’साठी अर्ज करण्याची १६ मार्च ही शेवटची तारीख होती. यंदाच्या विद्यार्थी नोंदणीने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ५ मे रोजी नीटची परीक्षा होणार आहे. १४ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. २०२३ मध्ये २०,७७,४६२ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा नोंदणी केली होती. यंदा २८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीटसाठी अर्ज केला आहे.

जागा केवळ १ लाख ९ हजार

देशभरात ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतून एम. बी. बी. एस.च्या १,०९,१४५ जागा असून, यावर्षी या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डेन्टलच्या २७ हजार जागा आहेत. एम. बी. बी. एस., बी. डी. एस., आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि पशुवैद्यकीय या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीटच्या गुणांवरच होत असून, सर्व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होतात.

दुरुस्तीची खिडकी तीन दिवस खुली

‘नीट’च्या अर्जात माहितीअभावी अनेक विद्यार्थ्यांनी चुका केल्या असून, या चुका दुरुस्त करण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संधी दिली आहे. १८ ते २० मार्च या कालावधीत करेक्शन विंडो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मोबाइल नंबर व ई-मेल आयडी वगळता विद्यार्थ्यांना अर्जात सर्व प्रकारची दुरुस्ती एकदाच करता येईल. फोटो, सही आणि बोटांचे ठसे अपलोड करण्यात चूक झाली असेल तर ते नव्याने अपलोड करता येतील.

दाखले बंधनकारक नसल्याने अर्ज वाढले

वैद्यकीय शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असून, नीट परीक्षेसाठी दरवर्षी विक्रमी नोंदणी होत आहे. यंदा अर्ज करताना १० वी किंवा ११ वीचा निकाल व जात प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक नसल्याने परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी म्हणून ११ वीच्या अनेक विद्यार्थ्यांनीदेखील अर्ज केलेला आहे. त्यामुळेही परीक्षार्थींचा आकडा आणखी वाढला आहे.

नीट परीक्षेसाठी अर्ज करताना भरलेली माहिती नंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठीदेखील वापरली जाते. त्यामुळे नीट परीक्षेसाठी केलेल्या अर्जात झालेली चूक विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत तत्काळ दुरुस्त करून घ्यावी. यासाठी विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

Web Title: More than 28 lakh students registered for NEET-UG exam for admission to medical degree courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.