उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

By संतोष भिसे | Published: May 11, 2024 03:56 PM2024-05-11T15:56:02+5:302024-05-11T15:56:53+5:30

चारा व पाणीटंचाईचा दूध उत्पादनावर परिणाम

Milk production in Sangli district decreased by one lakh liters due to summer | उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

सदानंद औंधे

मिरज : तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे.

जिल्ह्यात दररोज सुमारे १६ लाख लीटर दूध संकलन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यभरात, तसेच मोठ्या शहरांत निर्यात होते. दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठीही वापर होतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध असल्याने १० ते १५ टक्के उत्पादन वाढते.

मात्र, उन्हाळ्यात उत्पादन घटल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीत सुमारे १८ लाख लीटर, मार्चमध्ये १७ लाख लीटर व एप्रिल महिन्यात १६ लाख लीटर दैनंदिन दूध उत्पादन झाले आहे. उन्हाळ्यात पाणी व चाराटंचाई जाणवत असल्याने घट झाल्याचे दिसत आहे.

नदीकाठावरील चार तालुक्यांत मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दुधाचा व्यवसाय आहे. दैनंदिन उत्पादनापैकी ६० टक्के दूध गायीचे आहे. यावर्षी तीव्र उन्हाचा परिणाम चाऱ्यावर व दूध उत्पादनावर झाला आहे.

सर्वाधिक संकलन चितळेंचे

चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअरी, १७ मल्टीस्टेट दूध संघ दुधाचे संकलन करतात. खासगी डेअरींचे दररोज संकलन आठ लाख ५० हजार लीटर आहे. त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे दररोजचे संकलन आठ लाख लीटर आहे.

जिल्ह्यातील सरासरी दूध उत्पादन

जानेवारी - १८,८९,१९६ लीटर, फेब्रुवारी - १७,७९,०९७ लीटर, मार्च - १७,०८,१७५ लीटर, एप्रिल - १६,०१,८४६ लीटर

Web Title: Milk production in Sangli district decreased by one lakh liters due to summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.