नाराज नगरसेवकांची संघर्षाची तयारी महापौरांना जाब विचारण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2015 12:06 AM2015-06-24T00:06:34+5:302015-06-24T00:42:46+5:30

उघड संघर्षाला अडचणी

The mayor will be asked to prepare for the conflict of angry corporators | नाराज नगरसेवकांची संघर्षाची तयारी महापौरांना जाब विचारण्यात येणार

नाराज नगरसेवकांची संघर्षाची तयारी महापौरांना जाब विचारण्यात येणार

Next

सांगली : महापालिकेच्या बजेट पुस्तिकेतून प्रत्येक प्रभागासाठी गृहीत धरण्यात आलेली आठ कोटी रुपयांची बायनेम कामे महापौर विवेक कांबळे यांनी काढून टाकल्यामुळे सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यही नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या सत्ताधारी सदस्यांनी महापालिकेत मंगळवारी बैठक घेऊन महापौरांना जाब विचारण्याचा निर्धार केला.
महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अंदाजपत्रकीय चर्चा झाली, त्यावेळी प्रत्येक सदस्याची ५० लाखांची बायनेम कामे अंदाजपत्रकात धरली होती. एकूण ८ कोटी रुपयांची ही कामे होती. त्यानंतर अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर करण्यात आले. महापौरांकडून ते आता अंतिम झाले आहे. अंदाजपत्रकाची पुस्तिका प्रसिद्ध होईपर्यंत महापौरांनी ही सर्व कामे अंदाजपत्रक अंतिम करताना समाविष्ट केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष सोमवारी जेव्हा या प्रती नगरसेवकांच्या हातात पडल्या, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. महापौरांनी बायनेम कामांनाच कात्री लावली. स्थायी समितीने धरलेली ८ कोटींची बायनेम कामे या पुस्तिकेतून गायब झाली आहेत. प्रत्येक प्रभागासाठीच्या तरतुदींपुढे शून्य दिसत असल्याने नगरसेवकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेत मंगळवारी सुमारे २५ नगरसेवकांनी एकत्रित येऊन अंदाजपत्रकाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. याबाबत महापौरांना जाब विचारण्याची तयारी सर्वांनी केली आहे. ही कामे रद्द करण्यामागचे कारण अजूनही महापौरांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी एकत्रितपणे याबाबतची विचारणा करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनीही याप्रश्नी महापौरांना धारेवर धरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे बायनेम कामे रद्द करण्याचा हा महापौरांचा निर्णय कळीचा मुद्दा बनला आहे.
प्रभाग समित्यांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्येक समितीला दीड कोटी रुपयांप्रमाणे ६ कोटींची तरतूद महापौरांनी अंदाजपत्रकात केली होती. प्रत्यक्षात संबंधित समित्यांमार्फत यापूर्वी झालेल्या कामांची बिलेच थकित होती. प्रत्येक प्रभाग समितीच्या थकित रकमांचा हिशेब झाल्यानंतर समित्यांच्या खात्यावर एकूण ६ लाखाचीसुद्धा शिल्लक दिसत नाही. त्यामुळे सदस्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आता वर्षभरात कोणतेही काम करण्यासाठी पैशाची तरतूद नाही. (प्रतिनिधी)

उघड संघर्षाला अडचणी
महापालिकेत कोणताही वाद यापुढे होता कामा नये, असा डोस सत्ताधाऱ्यांचे नेते मदन पाटील यांनी दिल्यामुळे सत्ताधारी सदस्यांची गोची झाली आहे. नाराजी लपविता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे.

Web Title: The mayor will be asked to prepare for the conflict of angry corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.