दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क परत मिळणार; सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:33 PM2024-01-05T17:33:00+5:302024-01-05T17:37:56+5:30

उपमुख्यमंत्र्यांच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सूचना

Examination fees of students from drought affected talukas of Sangli and Satara districts will be refunded | दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क परत मिळणार; सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा

दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क परत मिळणार; सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा

विटा : सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम त्यांना तातडीने परत मिळणार आहे. याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची रक्कम लवकरच परत मिळणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी दिली.

ॲड. पाटील म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करून त्यांना भरलेली शुल्काची रक्कम परत करावी, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ स्तरावर करून त्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन त्यांनाही दुष्काळी विद्यार्थ्यांची फी माफ करून रक्कम परत करण्याची विनंती केली होती.

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषय समजून घेतल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून त्यांचे पैसे परत देण्याबाबत सूचना दिल्या. त्यांच्या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, तासगावचा पूर्व भाग, शिराळ्याचा पश्चिम भाग तसेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काही तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ होईल. त्यांनी यापूर्वी भरलेली परीक्षा शुल्कची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Examination fees of students from drought affected talukas of Sangli and Satara districts will be refunded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.