आमदारांची मोर्चेबांधणी अन् भूछत्रांचा वाढता जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM2019-07-19T00:44:18+5:302019-07-19T00:44:39+5:30

वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

 Emphasis of MLAs and increasing emphasis on mosaic | आमदारांची मोर्चेबांधणी अन् भूछत्रांचा वाढता जोर

आमदारांची मोर्चेबांधणी अन् भूछत्रांचा वाढता जोर

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभेसाठी भाऊगर्दी : विद्यमानांची मतदार संघात जुळवाजुळव

दीपक शिंदे ।
सातारा : विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तसे निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात भूछत्र्या उगवण्याचे प्रमाण जास्त असतं, त्याप्रमाणे निवडणुका आल्या की ही राजकीय भूछत्रं उगवतात; पण जरा उन्हाची तिरीप लागली की भूछत्रांचा सुकून वाळा होतो. तशीच अवस्था या इच्छुकांचीही होणार आहे. वरिष्ठ नेत्यांना भेटून कामाचा पुळका आणायचा आणि आम्हीच कसे तुमचे तारणहार आहे, याचा आव आणण्याचाच सध्या प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कोणाला विरोध तर कोणाला सोबत घेऊन एकमेकांची खोड मोडण्याचे राजकारण सुरू आहे. काही ठिकाणी तर ज्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येता येत नाही, असे लोक स्वत:लाच विधानसभेचा उमेदवार घोषित करू लागले आहेत. तर काहीजण नेत्यांना मतदार संघातील समस्यांचे पत्र देऊन आश्वासन घेऊ लागले आहेत. गुप्त बैठका आणि नियोजन याच्यावर भर दिला जात असतानाच आपली ताकद आणि जनाधार याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे.

गेल्या पाच वर्षांत गावात काय काम आहे, कोणाची काय अडचण आहे? याच्याशी देणे-घेणे नसणाऱ्यांना एकदम गावाची आणि गावातील लोकांची, प्रलंबित कामांची काळजी वाटू लागल्याने गावकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढलेली आहे; विद्यमान आमदाराचा पराभव करण्यासाठी सर्व इच्छुक आता एकत्र आलेत. प्रत्येकजण आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन आणि तयारीसह मतदारांपर्यंत पोहोचत आहे. जवळपास सर्वच विधानसभा मतदार संघातही इच्छुकांची संख्या वाढत आहे. एकास एक लढत झाली तर काही गणिते मांडता येतात; पण बहुरंगी लढती झाल्या की कोणाच्या पदरात काय पडणार? याचा मागमूसच लागत नाही. चांगल्या उमेदवाराचीही गोची करण्याचे काम ही ऐनवेळची भूछत्रे करीत असतात.

सध्या विद्यमान आमदारांनी केलेल्या कामांची सरबत्तीच सुरू केली आहे. तर निवडणूक लढवू इच्छिणारे गेल्या अनेक वर्षांत न झालेल्या कामांची यादी तयार करू लागले आहेत. ही कामे आपल्याशिवाय कोणीच करू शकणार नाही, असा विश्वासही देऊ लागल्याने मतदारांनाही आश्चर्य वाटत आहे; पण केवळ निवडणुकीपुरता फायदा करून घेण्यासाठी अनेकजण रिंगणात उतरतात आणि पुन्हा गायब होतात. ते पाच वर्षे दिसतच नाहीत. त्यांना मतदारही ओळखतात, त्यामुळेच ही पावसाळ्यातील भूछत्रे फक्त पावसाळ्यातच उगवतात, असा टोला त्यांना मारला जाऊ लागल्याचे दिसत आहे.

आठ मतदार संघांत इच्छुकांची चाचपणी
जिल्ह्यातील आठ मतदार संघांत सध्या ४२ जण इच्छुक आहेत. यातील काही मातब्बर तर काही नव्याने प्रयत्नाच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदारांना जेरीस आणण्याचा प्रयत्नही काहीजणांनी केला आहे. त्याची झलक लोकसभा निवडणुकीत दाखवूनही दिली आहे. त्यामुळे आता सावध पवित्रा घेऊनच विद्यमानही रिंगणात उतरणार आहेत. कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी निवडणुकीपूर्वीच मतदारसंघ बांधून ठेवण्याची किमया केली जात आहे.

Web Title:  Emphasis of MLAs and increasing emphasis on mosaic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.