जतमध्ये बोर नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरूच --: प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:32 PM2019-06-14T22:32:37+5:302019-06-14T22:33:06+5:30

महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे. ‘दुष्काळाचा महिना, वाळू माफियाचा महिमा’ अशी अवस्था येथे झाली आहे.

In the case of illegal sand extraction in the Bor river basin -: neglect of administration | जतमध्ये बोर नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरूच --: प्रशासनाचे दुर्लक्ष

जतमध्ये बोर नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरूच --: प्रशासनाचे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला; कारवाईची गरज

गजानन पाटील ।
संख : महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने जत पूर्व भागातील बोर नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे. ‘दुष्काळाचा महिना, वाळू माफियाचा महिमा’ अशी अवस्था येथे झाली आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. काळ्या सोन्याच्या तस्करीमधून लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जात आहे आणि सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून वाळू तस्करी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

पूर्व भागातील, संख, सुसलाद, हळ्ळी, बेळोंडगी, सोनलगी, बालगाव, खंडनाळ या गावांजवळ बोर नदीचे पात्र मोठे आहे. संख अप्पर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत सिध्दनाथ ते सुसलादपर्यंत ६४ कि.मी. लांबीचे ओढापात्र आहे. नदीपात्रातून बांधकामासाठी वाळू मिळते. त्यामुळे वाळू तस्करीचा धंदा जोमात सुरू आहे. महसूल विभागाच्या व पोलिसांच्या दुर्लक्षाने ओढापात्रातून बेसुमार वाळू तस्करी केली जात आहे.

कर्नाटकमध्ये वाळूला जास्त मागणी आहे. कर्नाटकची हद्द जवळ असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू तस्करी केली जाते. वाळूचे कर्नाटक हद्दीत शेतामध्ये डेपो मारले जातात. ट्रॅक्टरच्या एका खेपेला दोन हजार ते अडीच हजार रुपये, तर टिपरला आठ ते दहा हजार रुपये मिळतात. त्यामुळे हा व्यवसाय सोन्याची अंडी देणारा व्यवसाय आहे. यामुळे सुसलाद, करजगी, बेळोंडगी, हळ्ळी, सोनलगी, बालगाव, संख येथील ओढापात्रात वाळू तस्करी जोमात सुरु आहे.

या व्यवसायात गावपुढारी, स्थानिक नेत्यांचा मोठा सहभाग आहे. प्रत्येकजण या व्यवसायाकडे आकर्षिला जात आहे. काहीजणांनी वाळूसाठी ट्रॅक्टर, जेसीबी आणले आहेत. महसूल विभागात गौण खनिजाच्या दंडात्मक कारवाईत २२ लाखाचा घोटाळा झाला आहे. यामध्ये वाळू तस्करावर व जत तहसील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला आहे.


पाणी पातळी खालावली
बेकायदेशीर वाळू उपशामुळे हजारो वर्षांचा असणारा भूगर्भातील खजिना संपुष्टात येणार आहे. ओढा-पात्रात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता बारीक रेतीच्या वाळूमध्ये आहे. वाळूने भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवली जात होती. विहीर, कूपनलिकांना याचा फायदा होत होता. वारेमाप वाळू उपसा केला जात असल्याने याचा मोठा परिणाम पाणी पातळीवर झाला आहे. त्यामुळे सध्या पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत गेली आहे.
 

चोर-पोलिसांचा खेळ
महसूल विभागाकडून छापे टाकले जात आहेत, पण वाळू पकडून जुजबी दंड करून, चिरीमिरी घेऊन सोडले जात आहे. काहीवेळा आधी छापे पडणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे वाळू वाहने पसार होतात. हा चोर-पोलिसांचा खेळ नित्याचाच आहे.


दक्षता समिती गायब
तत्कालीन अप्पर तहसीलदार नागेश गायकवाड यांनी वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामसेवक, कोतवाल, गावकामगार तलाठी यांची दक्षता समिती स्थापन केली होती. समितीच्या प्रभावी कामामुळे कागनरी, खंडनाळ, पांढरेवाडी, भिवर्गी या गावात वाळू तस्करी बंद झाली होती. मात्र नागेश गायकवाड यांची बदली झाल्यानंतर वाळू तस्करी जोमाने सुरू झाली आहे. दक्षता समितीही गायब झाली आहे.

Web Title: In the case of illegal sand extraction in the Bor river basin -: neglect of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.