शक्तिपीठमधून ठेकेदारांचे कल्याण, शेतकऱ्यांवर मात्र नांगर; सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
By संतोष भिसे | Published: March 16, 2024 06:08 PM2024-03-16T18:08:07+5:302024-03-16T18:09:45+5:30
सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले ...
सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. सांगलीत २३ मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या तयारीसाठी आज, शनिवारी मणेराजुरी (ता. तासगाव) येथे बैठक झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.
शेटफळे (ता. आटपाडी), घाटनांद्रे, तिसंगी (ता. कवठेमहांकाळ), डोंगरसोनी, सावळज, मणेराजुरी, नागाव कवठे (ता. तासगाव) येथेही बैठका झाल्या. त्यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी मार्गदर्शन केले. देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाला किंवा धार्मिक स्थळे जोडण्याला आमचा विरोध नाही. पण हजारो एकर जमीन महामार्गात जाऊन शेतीवर नांगर चालणार असेल, तर महामार्ग कशासाठी? हा प्रश्न आहे.
खराडे म्हणाले, महामार्गाला विरोधासाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येत आहेत. सांगलीतील शनिवारच्या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आजवर पवनचक्क्या, रत्नागिरी- नागपूर महामार्ग, राज्यमार्ग, गुहागर-विजापूर महामार्ग यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत, पण त्यातून ते सुखी झालेले नाहीत. आता शासनाने शक्तिपीठच्या रुपाने नवे संकट लादू नये.
यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनीही महामार्गाविरोधात तीव्र भूमिका व्यक्त केल्या. बैठकीला प्रभाकर पाटील, सुनील पवार, पी. वाय. भोसले, गुलाम मुलाणी, किशोर कोडग, शरद पवार, भालचंद्र कोडग, अमर शिंदे, वामन कदम, शरद जाधव, विशाल गायकवाड, प्रकाश गायकवाड, गणेश गायकवाड, गुलाबराव गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.
आता कोठे चांगले दिवस येताहेत..
साखळकर म्हणाले, महामार्गामुळे नदीकाठच्या गावात महापुराचे संकट गडद होणार आहे. कोणीही मागणी केलेली नसताना नव्या शक्तिपीठ महामार्गाचे प्रयोजन काय? याचे उत्तर शासनाने द्यावे. म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यामुळे दुष्काळी भागातील शेतीमध्ये सोने पिकू लागले आहे. तेथे महामार्गासाठी नांगर चालविण्याचे पाप शासनाने करु नये. महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही.