Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली 

By संतोष भिसे | Published: February 20, 2024 05:01 PM2024-02-20T17:01:14+5:302024-02-20T17:04:00+5:30

झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले

As the farmer blocked the road saying that he did not want to go from the farm, the pregnant woman was carried to the ambulance in a zoli in sangli | Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली 

Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली 

सांगली : तिचे दिवस भरले होते. प्रसूती क्षणाक्षणाला जवळ येत होती. पतीसह सारेच कुटुंबिय चिंतेत. पण माणुसकीची परीक्षा अद्याप व्हायची होती. असह्य प्रसववेदनांतून तिच्या सुटकेसाठी रुग्णवाहिका दारात आली, पण समोरचा शेतकरी वाट अडवून उभा राहिला. म्हणाला, माझ्या शेतातून जायचे नाही. कुटुंबियांनी गर्भवतीला झोळीत घातले, काट्याकुट्यातून, ओढ्याओघळीतून कसेबसे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले.

एरवी आदिवासी पाड्यांत किंवा डोंगरदऱ्यांत वारंवार पहायला मिळणारे हे वेदनादायी चित्र प्रगत समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात मंगळवारी अनुभवण्याची वेळ आली. मिरज तालुक्यातील आरग गावात सुमारे चार तास ही गर्भवती जन्ममृत्यूचा संघर्ष करत होती. हातापायाने धड असणारी माणसे मात्र माणुसकी हरवून दगड झाली होती. रेल्वे स्टेशन रस्त्यावर माळी मळ्यातील महिलेच्या प्रसूतीसाठी डॉक्टरांनी या आठवड्यातील तारीख दिली होती. कुटुंबियांना तिच्या प्रसूतीपेक्षा रस्ता कसा मिळणार? याचीच चिंता होती. त्यांची वाट एका शेतकऱ्याने अडवून धरली आहे.

आज तिला वेदना असह्य झाल्याने कुटुंबियांनी १०८ रुग्णवाहिकेला हाक दिली. ती धावत आलीदेखील, पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता.  कुटुंबियांनी संबंधित शेतकऱ्याशी फोनवर संपर्क करुन रुग्णवाहिकेला रस्त्यासाठी हात जोडले, पण तो बधला नाही. रुग्णवाहिकेसोबतच गर्भवतीही ताटकळली होती. नवा जीव जगात येण्यासाठी आसुसला होता, पण माणुसकी जणू त्याचीही परीक्षा घेत होती. तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी माहिती मिळताच धाव घेतली. संबंधित शेतकऱ्याला फोनवर फोन केले. गर्भवतीसाठी आणि रुग्णवाहिकेसाठी माणुसकीची साद घातली. पण त्याला पाझर फुटला नाही.

यादरम्यान, माळी कुटुंबियांनी गावात मंडलाधिकाऱ्यांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांनीही मध्यस्थीचे प्रामाणिक प्रयत्न केले. पण तोडगा निघाला नाही. त्यामुळे  कुटुंबिय थेट तालुक्याला महिला तहसीलदारांकडे धावले. गर्भवतीच्या सुटकेची विनंती केली. तहसीलदारांचा विचारविमर्श होईपर्यंत गर्भवतीच्या कळा क्षणाक्षणाला वाढत होत्या. तहसीलदारांचा निर्णय झालाच नाही, तोपर्यंत ग्रामस्थ व कुटुंबियांनी तिला झोळीत घातले. काट्याकुट्यातून, ओढ्याओघळीतून आणि बांधाबांधांवरुन रुग्णवाहिकेकडे आणण्याचा प्रयत्न केला. आडवे लावलेले गेट उघडले. शेतकऱ्याने घातलेला बांधही तात्पुरता दूर केला. तिला कसेबसे रुग्णवाहिकेत घातले. रुग्णवाहिका सुसाट वेगाने मिरजेकडे निघाली. 

दोन वर्षांनंतरही निर्णय नाही

महसूल विभागाकडे शेतरस्त्याचे अनेक दावे वर्षानुवर्षे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आरगमधील माळी कुटुंबियांचा रस्ताही त्यातच अडकून पडला आहे. रस्ता अडविल्याने त्यांना शेती करणे मुश्किल झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या ऊसासाठी मंडलाधिकाऱ्यांनी अन्य शेतकऱ्याला विनंती करुन तात्पुरता रस्ता दिला, पण आज गर्भवतीसाठी मात्र तो मिळाला नाही. नऊ महिन्यांच्या वेदना सहन केलेल्या गर्भवतीला आजचे काही तास मात्र जन्मजन्मांतरीच्या पुण्याईचा कस पाहणारे ठरले.

Web Title: As the farmer blocked the road saying that he did not want to go from the farm, the pregnant woman was carried to the ambulance in a zoli in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.