ग्रामपंचायतींसाठी ८३% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:09 AM2017-10-17T00:09:57+5:302017-10-17T00:10:32+5:30

83% voting for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी ८३% मतदान

ग्रामपंचायतींसाठी ८३% मतदान

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने आणि ईर्षेने सुमारे ८३.३२ टक्के मतदान झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी १०,०५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कडेगाव, वाळवा, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीआणि वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित तालुक्यांत शांततेत मतदान झाले. मतमोजणी आज (मंगळवारी) तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. दुपारी चारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत.
जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींपैकी २९ बिनविरोध झाल्यामुळे ४२४ गावांमध्ये सरपंचपदासाठी ११४१ उमेदवार रिंगणात उतरले होते. ग्रामपंचायत सदस्यांच्या १६३० जागांपैकी ३८९ सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे १२४१ जागांसाठी ८९८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. दुपारनंतर मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगाच्या-रांगा लागल्या होत्या. उमेदवारांनी बाहेरगावच्या मतदारांसाठी मोटारी, खासगी बसेसची सोय केली होती. जिल्ह्यात ११.३० पर्यंत ३६.३५ टक्के, तर दुपारी दीडपर्यंत ५७.९३ टक्के आणि साडेतीनपर्यंत ७२.९७ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाचला वेळ संपताना ८३.३२ टक्के मतदान झाले होते. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ८६.९८ टक्के, तर सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७९.१७ टक्के मतदान झाले. जत तालुक्यातील संख येथे रात्री ८.४९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. येथे पावसामुळे मतदानासाठी अडथळा आल्यामुळे मतदारांना केंद्रावर येण्यास उशीर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला असतानाही तासगाव तालुक्यातील चिंचणी, मणेराजुरी, आरवडे, वाळवा तालुक्यातील वाटेगाव, चिंचणी, ऐतवडे खुर्द येथे मारामारी झाली. मणेराजुरी, आरवडे, वाटेगाव येथे तणावाचे वातावरण होते. खानापूर तालुक्यातील लेंगरे, भाळवणी, आळसंद, कमळापूर, गार्डी येथे बाचाबाची झाली. कमळापूर येथे बोगस मतदान करण्यासाठी येणाºया दोन गाड्या पोलिसांनी पकडल्या. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रेत किरकोळ बाचाबाचीचा प्रकार घडला. तेथे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. संवेदनशील मतदान केंद्रांवर तणावाचे वातावरण होते. पण बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. वाळवा तालुक्यातील मर्दवाडी, तासगाव तालक्यातील आरवाडे, पलूस तालुक्यातील सांगडेवाडीसह अनेक गावांत मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. मात्र ती तातडीने दुरुस्त करण्यात आली.
जिल्ह्यात झालेले मतदान...
तालुका टक्केवारी
जत ८०
क.महांकाळ ८६
शिराळा ८६.९८
वाळवा ८१.७३
पलूस ८५.७३
कडेगाव ८२.९६
तासगाव ८४.२६
मिरज ८५
खानापूर ७९.१७
आटपाडी ८१.७२
एकूण ८३.३२

Web Title: 83% voting for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.