चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

By शीतल पाटील | Published: December 2, 2023 01:50 PM2023-12-02T13:50:26+5:302023-12-02T13:50:40+5:30

वारणा नदी की धरण वाद पेटणार

1500 crores in air for water from Chandoli dam | चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

चांदोली धरणातून पाण्यासाठी हवेत १५०० कोटी, मदनभाऊ युवा मंच आक्रमक

शितल पाटील

सांगली : सांगली व कुपवाड शहराला चांदोली धरणातून पाणी मिळावे, की वारणा नदीतून हा वाद नजीकच्या काळात चांगलाच पेटणार आहे. चांदोली धरणातून पाणी आणण्यासाठी जवळपास १,५०० कोटीची गरज भासणार आहे. याशिवाय देखभाल दुरूस्तीचा प्रश्न वेगळाच आहे. त्याऐवजी वारणा नदीतून पाणी देण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

कृष्णा नदी कोरडी पडत आहे. शिवाय कृष्णेच्या प्रदूषणात वाढ झाल्याने २००६ साली तत्कालीन मंत्री मदनभाऊ पाटील यांनी वारणा पाणी योजना आखली होती. पण, त्यानंतर महापालिकेत सत्ताबदल झाल्याने वारणा नदीतून पाणी उचलण्याची योजना बारगळली. आता पुन्हा या योजनेची गरज भासू लागली आहे. त्यासाठी मदनभाऊ युवा मंचाने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समडोळी येथून वारणा नदीतून पाणी उपसा केले जाणार होते. पण समडोळीकरांनी विरोध केल्याने आता हरिपूर हद्दीतून पाणी उचलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

अनेक अडथळे 

त्यात नागरिक जागृती मंचाने चांदोली धरणातून पाणी आणण्याची मागणी लावून धरली आहे. पण त्यासाठी येणारा खर्च पाहता धरणातून पाणी सांगलीकरांच्या दारापर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत. जवळपास १०० किलोमीटरहून पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्याऐवजी १० किलोमीटरवर असलेल्या वारणा नदीतून पाणी उचलून सांगली व कुपवाडला देणे संयुक्तिक ठरणार असल्याचे मतही काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वारणेसाठी २७० कोटी

वारणा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी २७० कोटीचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यात १० किलोमीटरची साडेतीन फूट पाइपलाइन, दोन टंकवेल, एक जॅकवेल, बारा ठिकाणी पाण्याच्या टाक्या, गावठाणमध्ये जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह कृष्णा नदीवर छोटा पूल उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

चांदोलीसाठी १,५०० कोटी

सांगली ते चांदोली धरणापर्यंतचे अंतर जवळपास ११० ते ११७ किलोमीटर आहे. प्रत्येक किलोमीटरला ९ कोटीचा खर्च धरला तर जवळपास १,०५३ कोटी रुपये केवळ पाइपलाइनसाठी लागतील. याशिवाय विविध परवाने, सर्वेक्षण, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई हा खर्च पाहता ही योजना दीड हजार कोटीपर्यंत जाऊ शकते.

महापालिकेवर आर्थिक भार

वारणा पाणी योजनेसाठी महापालिकेवर ८१ कोटींचा बोजा पडणार आहे. तर चांदोलीतून पाणी आणण्यासाठी जवळपास ४०० कोटींचा भार पालिकेवर येईल. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ४०० कोटी रुपयांचा हिस्सा देणे अशक्यप्राय आहे.

पाण्याचा हार्डनेस किती?

सध्या महापालिका कृष्णा नदीतून पाणी उचलते. या पाण्याचा शुद्धीकरणानंतरचा हार्डनेस २८४ ते ३५० दरम्यान आहे. महापालिकेने अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. तेथील पाणी जुन्या जलशुद्धीकरण केंद्रापेक्षा चांगले आहे. वारणा नदीच्या पाण्याचा हार्डनेस ७६ इतका आहे. कृष्णेपेक्षा वारणेचे पाणी शुद्ध आहे. त्यामुळे वारणा नदीतून पाणी उचलणेच योग्य ठरणार आहे.

चांदोली धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या या योजनेत अनेक अडचणी आहेत. शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्यासाठी महापालिकेकडे कामगार नाहीत, तिथे धरणातून आलेल्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती होईल का, याचा विचार करावा. धरणातून पाणी आणण्यासाठी किती वर्षे जातील, याचा नेम नाही. काही जण वारणा योजना होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. या योजनेला खो बसल्यास त्या पापाचे धनी कोण? वारणा योजना मदनभाऊंच्या नावे असल्याने काहींना पोटशूळ आहे. या झारीतील शुक्राचार्यांनी चांदोली धरणातून पाणी आणण्याची योजना कधी पूर्ण होणार हे जाहीर करावे. - आनंद लेंगरे, जिल्हाध्यक्ष, मदनभाऊ युवा मंच.

Web Title: 1500 crores in air for water from Chandoli dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.