Friendship Day 2018: समाज माध्यमांमुळे मैत्रीही झाली ‘ग्लोबल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 01:55 AM2018-08-05T01:55:03+5:302018-08-05T01:55:20+5:30

जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले.

Friendship Day 2018: 'global' friendship with society | Friendship Day 2018: समाज माध्यमांमुळे मैत्रीही झाली ‘ग्लोबल’

Friendship Day 2018: समाज माध्यमांमुळे मैत्रीही झाली ‘ग्लोबल’

googlenewsNext

मुंबई : जागतिकीकरणानंतर स्पर्धा निर्माण झाल्याने मनुष्याचे जीवन धावपळीचे बनले. आप्तेष्टांसमवेत संवाद साधण्यासाठीही त्याला वेळ कमी पडू लागला. त्यामुळे नाती दुरावली. मात्र, इतर नाती दुरावली असली तरीही मैत्रीचे नाते कायमच त्याच्या जवळ राहिले आहे; कारण मैत्री हे एक असे नाते आहे, जे लोणच्यासारखे मुरत जाते आणि त्याला वेळ, काळ आणि जागेचे बंधन नसते. त्यामुळे ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मैत्रीही ‘ग्लोबल’ झाली आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘पत्रमित्राची’ जागा चॅटिंग रूमने घेतली आहे. व्हर्च्युअल फ्रेंडशिपने मैत्रीचे वर्तुळ अजून व्यापक बनत आहे. काही अपवाद वगळता या व्हर्च्युअल जगातील मैत्रीची ओढ तशीच टिकून आहे. आयुष्यात कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आपण स्वीकारतो आणि काही गप्पांमध्येच तो कधी आपला जवळचा मित्र होतो, हे कळतही नाही.
काही दशकांपूर्वी ज्यांना काही कारणांमुळे शाळेतील मित्र-मैत्रिणींशी संपर्क राखता आला नाही, त्यांनाही या आधुनिक जगामध्ये पुन्हा एकत्र आणण्याचे व्यासपीठ सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाले आहे. मैत्रीचे सेतू उभारण्यासाठी आज अनेक साधने अक्षरश: हात जोडून उभी आहेत. फेसबुक, गुगल प्लस, टम्बलर, लिंक्डइन, टिष्ट्वटर, जीटॉक, व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅट, इन्स्टाग्राम अशी अनेक सोशल नेटवर्किंगची माध्यमे आज मैत्रीची माध्यमे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या जगात ‘मैत्री करा, मैत्री जपा, मैत्री वाढवा’ असा जणू मंत्रजागरच अखंड चालू आहे.
जगाच्या दुसऱ्या कोपºयात असणाºया मित्राला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायचेय? मग त्याला फेसबुकच्या फोटोवर टॅग करा. एखादी विनोदी घटना त्याला सांगायची आहे? तर व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉइस चॅटवरून त्याला मेसेज करा. तुम्ही काढलेले फोटो पिकासावर अपलोड करून त्याला दाखवा. हे सगळे क्षणार्धात होईल इतके आभासी जग तुमच्या-आमच्या जवळ सोशल मीडियाने निर्माण केले आहे.
मैत्री टिकविण्याचे काम या सोशल नेटवर्किंग साइटवरून होत असले, तरीही ती मैत्री रुजते-फुलते आणि दृढ होते ती ‘वेव्हलेन्थ’ जुळल्यानंतरच. आधीच्या पिढीमध्ये मित्र रस्त्यावर, शाळेत, कॉलेजमध्ये, मैदानावर, घराच्या बाहेर भेटत होते. आता हेच मित्र आॅनलाइनच्या ‘व्हर्च्युअल’ जगामध्ये भेटतात. त्यांचे हे नवे कट्टे आणि नवे अड्डेच आहेत. मैत्री तीच, तिचे माहात्म्यही तेच; फक्त भेटण्याच्या जागा बदलल्या. रोज भेटून गप्पा मारण्याची जागा व्हॉट्सअ‍ॅपच्या चॅटबॉक्सने घेतली. इतकाच काय तो फरक, बाकी ये दोस्ती... आहेच की..!
२0 वर्षांनंतर
मित्र आले एकत्र
सोशल मीडियाच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७६ सालच्या बॅचचे विद्यार्थी जोडले गेले आहेत. या सवंगड्यांनी शाळेत १ ली ते १० वीपर्यंतची १० वर्षे आनंदात घालवली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशविदेशात ते स्थायिक झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनही उत्साहात साजरे केले आहे.
२००८ साली या विद्यार्थ्यांचे पहिले स्नेहसंमेलन साजरे झाले. त्यानंतर २०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि यंदा फेब्रुवारी महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले. स्नेहसंमेलनाला मुंबई, ठाणे, वसई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, हैदराबादसह अमेरिका, दुबई येथून मित्र-मैत्रिणी आवर्जून येतात.
१९६६ ते ७६ चा शाळेतील काळ वेगळा होता. त्या वेळी मोकळे वातावरण नव्हते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आमच्या शाळेतील १९७६च्या बॅचचे सुमारे ९० माजी विद्यार्थी रोज संपर्कात असतो आणि एकमेकांची सुख-दु:खं वाटतो. शाळेतील लोकप्रिय माजी पर्यवेक्षक अनिल कुलकर्णीदेखील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाला हजर असतात, असे यापैकी एक असलेल्या आरती भाटकर यांनी सांगितले.

Web Title: Friendship Day 2018: 'global' friendship with society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.