रत्नागिरीत नीलेश राणे पुरस्कृत गुंडगिरी - विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:33 PM2018-08-23T13:33:17+5:302018-08-23T13:35:25+5:30

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे.

Nilesh Rane rewarded bullying in Ratnagiri - Vinayak Raut | रत्नागिरीत नीलेश राणे पुरस्कृत गुंडगिरी - विनायक राऊत

रत्नागिरीत नीलेश राणे पुरस्कृत गुंडगिरी - विनायक राऊत

Next

रत्नागिरी : गेल्या चार वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे. या गुंडगिरीचा आम्ही धिक्कार करीत असून, त्याचा बंदोबस्त करावा, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे. त्याविरोधात आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

खासदार राऊत यांच्या मारुती मंदिर येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी यावेळी उपस्थित होते. खासदार राऊत यांनी नीलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मंगळवारी रात्री रत्नागिरीत एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात स्वाभिमान पक्ष विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू झाला आहे. या कार्यक्रमात स्वाभिमानच्या कार्यकर्त्याने आमदार उदय सामंत यांची अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा देणारी क्लिप दाखवली. त्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की व मारहाण केली. त्याचे पडसाद बुधवारी रात्री उमटले. शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचे कार्यालय काही लोकांनी फोडले. त्या प्रकरणी संशयित म्हणून स्वाभिमान पक्षाच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा राजकीय वाद आता वाढू लागला आहे.

याबाबत खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी परिसरात दादागिरी, गुंडगिरीचे अनेक प्रकार घडले आहेत. नीलेश राणे पुरस्कृत गुंड प्रवृत्तीच्या भाडोत्री लोकांकडून हे प्रकार घडत आहेत. रत्नागिरी शहर बाजारपेठेत असलेले सेना उपशहरप्रमुख बाबा चव्हाण यांचे दुकान स्वाभिमानच्या लोकांनी फोडले व चव्हाण यांना मारहाण केली. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या सहका-यांनी जेवण फुकट दिले नाही म्हणून शिविगाळ व दमदाटी केली, असा आरोप खासदार राऊत यांनी केला. याबाबत  पोलीस त्यांच्या पातळीवर बंदोबस्त करीत असल्याचे सांगितले. नीलेश राणे यांनी गुरुवारी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘आताच तर आम्ही सुुरुवात केली आहे, आमच्या विरोधात येणा-यांच्या घरात घुसून मारहाण करू, अशी भाषा वापरली आहे. एका माजी खासदाराने असे बोलणे हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे संकेत आहेत. पोलिसांनीही राणे यांचे हे विधान लक्षात घेऊन त्याबाबत योग्य कारवाई करणे आवश्यक आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

Web Title: Nilesh Rane rewarded bullying in Ratnagiri - Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.