कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक शेतीची कास धरून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:12 PM2018-12-11T12:12:56+5:302018-12-11T12:14:29+5:30

यशकथा : शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे.

millions earns from modern farming of agricultural land acquired in the ancestral land of Konkan | कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक शेतीची कास धरून मिळवले लाखोंचे उत्पन्न

कोकणातील वडिलोपार्जित जमिनीत आधुनिक शेतीची कास धरून मिळवले लाखोंचे उत्पन्न

Next

- मेहरून नाकाडे (रत्नागिरी) 

कोकणी बांधवांप्रमाणे अर्थार्जनासाठी मुंबईची वाट न चोखळता वडिलोपार्जित जमिनीतच शेती करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील माजळ गावचे सुपुत्र सुधीर माजळकर-चव्हाण यांनी घेतला आणि आपल्या कष्टाने हा निर्णय सार्थही ठरवला. शेतीमध्ये अर्धशतकी आयुष्य घालवताना त्यांनी आधुनिक शेतीची कास धरून यश मिळविले आहे. आज वयाच्या सत्तरीच्या आसपास असतानाही त्यांचा शेतीचा ध्यास तरुणांनाही लाजवेल असाच आहे. वेगवेगळे प्रयोग व सेंद्रीय शेती करून ते  दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवित आहेत.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सुधीर माजळकर यांनी मित्रांबरोबर नोकरीसाठी मुंबईकडे न जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आई- वडिल आनंदीत झाले. शेतीबाबतचे धडे त्यांना वडिलांनी दिले. स्वत:च्याच वडिलोपार्जित २० ते २२ एकर जमिनीमध्ये ते विविध प्रकारची पिके फुलवीत आहेत. सहा एकर क्षेत्रावर त्यांनी १,५०० काजूलागवड केली असून, त्यासाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त वेंगुर्ला ४ जातीची व गावठी काजूची लागवड केली आहे. दरवर्षी तीन ते साडेतीन टन काजूचे उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. संकलित केलेला सर्व काजू व्यापाऱ्याला विकत असल्याने पांढऱ्या सोन्याचे रोखीने उत्पन्न मिळत आहे. अडीच एकर क्षेत्रावर आंबा लागवड केली असून, हापूस तसेच विविध जातींची १५० कलमे लावली आहेत. ते आंबा बागेचे वर्षभर संगोपन करीत असले तरी हंगामातील फळे काढण्यासाठी व्यापाऱ्याला देत आहेत. त्यामुळे आंबा पिकातूनही दरवर्षी त्यांना रोख रक्कम प्राप्त होते. पाच एकर क्षेत्रावर ३५० नारळ लावला आहे. बाणवली, टीडीसारखी रोपे लावली असून, हजारोपेक्षा अधिक नारळ विक्रीतून उत्पन्न मिळवीत आहेत. नारळाची विक्री करण्यासाठी कोठेही बाहेर जावे लागत नाही. स्थानिक बाजारपेठेतच नारळ विक्री होते.

माजळकर यांनी पडीक जागेत सागाची एक हजार झाडे लावली असून, सागाची झाडेदेखील नगदी उत्पन्न देणारी आहेत.  दरवर्षी खरीप हंगामात एक एकर शेतीत ते भात लागवड करतात. यातून दोन टन तांदळाचे उत्पन्न ते घेतात. आंबा कलम बागेत त्यांनी २० वर्षांपासून गांडूळ खताची निर्मिती करीत असून दरवर्षी तयार झालेले तीन टन खत ते शेतीसाठी वापरतात यामुळे त्यांची शेती सुपिक झालेली असून उत्पन्नही चांगले मिळत आहे. अतिरिक्त झालेले गांडूळखत ते विक्री करून त्यामाध्यमातूनही पैसे कमवितात.पत्नी व पदवीधर असलेले दोन मुले त्यांच्याबरोबर शेतीमध्य्ो कार्यरत आहेत.

सुधीर माजळकर यांच्या शेतीतील कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेतर्फे शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भात पिकाचे विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या ६९ वर्षीदेखील ते शेतीच्या कामात नित्य व्यग्र असतात. कृषिसेवक, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:च्या शेतात नवनवीन प्रयोग ते करीत असतात.

Web Title: millions earns from modern farming of agricultural land acquired in the ancestral land of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.