कोलेखाजन चव्हाणवाडी ग्रामपंचायतीने बांध केला जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:40 PM2017-07-24T18:40:03+5:302017-07-24T18:40:03+5:30

न्यायालयात दाद मागणार : प्रताप चव्हाण

Kolekhanjan Chavanwadi gram panchayat bunda dam | कोलेखाजन चव्हाणवाडी ग्रामपंचायतीने बांध केला जमीनदोस्त

कोलेखाजन चव्हाणवाडी ग्रामपंचायतीने बांध केला जमीनदोस्त

Next

आॅनलाईन लोकमत

चिपळूण (जि. रत्नागिरी), दि. २४ : कोलेखाजन-चव्हाणवाडी येथील जांभ्या दगडाचा बांध ग्रामपंचायतीने अनधिकृत ठरवून भर पावसात तोडल्यामुळे आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे जागामालक प्रताप चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण यांनी आपल्या चुलत्यांकडून १९८६मध्ये २३ गुंठे जागा विकत घेतली. तेथे त्यांनी घर बांधले. आपल्या कुटुंबासह याठिकाणी राहताना आपल्या घराच्या बाजूला जांभ्याचा पक्का कठडा बांधला. तसेच आपल्या घराच्या डाव्या बाजूला ३ फुटाची पायवाट त्यांनी शेतकरी व जनावरांसाठी ठेवली होती. या वाटेच्या बाजूने जांभ्याचा बांध त्यांनी घातला. मात्र, दि. २८ मार्च रोजी काही स्थानिक ग्रामस्थांनी या बांधाला हरकत घेतली. त्यानंतर दि. २९ मार्च रोजी तंटामुक्त समितीत याबाबत चर्चा झाली. मात्र, तेथील तोडगा मान्य न झाल्याने आपण पोलिसात तक्रार केली. त्यानंतर तत्कालिन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यासमोर हरकत घेणारे ग्रामस्थ व आपली बैठक झाली. यावेळी आपण ३ फूट व लगतच्या जागामालकाने ३ फूट जमीन सोडावी, असे ठरले होते. यानंतर हरकत घेणाऱ्या ग्रामस्थांनी थेट तहसीलदारांकडे तक्रार केली. यावर चिपळूणचे तहसीलदार जीवन देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

आमचे जाबजबाब घेतले व दि. ३ जुलै रोजी आपल्याला नोटीस बजावली. मात्र, ही नोटीस आपल्याला दि. १२ जुलै रोजी मिळाली. त्यानंतर तहसीलदारांच्या निकालाचे कागदपत्र मिळावेत यासाठी आपण अर्ज केला. मात्र, कागदपत्र मिळण्याअगोदरच दि. १८ जुलै रोजी मिरजोळी ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या आदेशानुसार आपले पक्के कंपाऊंड जेसीबीच्या सहाय्याने भर पावसात जमीनदोस्त केले.

ग्रामपंचायतीची ही कारवाई सुरु असताना ग्रामसेवक मंगेश पिंगळे तेथे होते. आपण त्यांनाही याबाबत विचारले. तहसीलदारांच्या आदेशाने आपण बांधकाम तोडत आहोत, असे ग्रामसेवकांनी सांगितले. मात्र, याची कोणतीही लेखी आॅर्डर त्यांच्याकडे नव्हती. आपल्या खासगी जागेतून ३ फूट पायवाट स्वखुशीने विनामोबदला सोडली असतानाही ग्रामपंचायतीने ती अनधिकृत ठरवून आपले बांधकाम तोडल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Kolekhanjan Chavanwadi gram panchayat bunda dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.