दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्ष शिवसेनेचा तर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, 'असा' ठरला फार्म्युला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 01:38 PM2022-02-11T13:38:12+5:302022-02-11T13:38:45+5:30

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे निवडणुकीत शिवसेनेत दोन गट

In Dapoli Nagar Panchayat, the post of Mayor belongs to ShivSena and the post of Deputy Mayor belongs to NCP | दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्ष शिवसेनेचा तर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, 'असा' ठरला फार्म्युला 

दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्ष शिवसेनेचा तर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, 'असा' ठरला फार्म्युला 

Next

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे तर उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

या दोन्हा पक्षात नगराध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फार्म्युला ठरला आहे. पहिले अडीच वर्ष नगराध्यक्षपद शिवसेनेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून ममता मोरे यांच्या नावावर नगराध्यक्ष म्हणून एक मताने शिक्कामोर्तब करण्यात आले. तर राष्ट्रवादीकडून नगरसेवक खालीद रखांगे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली.

शिवसेनेच्या ममता मोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची बनली होती. परंतु शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आघाडीवर ठाम होते. त्यामुळे शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज निरर्थक बनला. 

शिवसेनेचे बंडखोर अपक्ष नगरसेवक यांच्या पाठिंब्यावर शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु बहुमताच्या जादूचा आकडा गाठणे खानविलकर यांना शक्य झाले नाही. शिवसेनेकडून व्हीप  सुद्धा बजावण्यात आला. शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या तरुण नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी पदार्पणातच पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यातील वादामुळे निवडणुकीत शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची आघाडी नगरपंचायत निवडणुकीत झाले आहे, परंतु ही आघाडी विद्यमान आमदार योगेश कदम यांना मान्य नाही. त्यामुळे आमदार समर्थकांनी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविली होती. परंतु नागरिकांनी मात्र आघाडीला स्पष्ट बहुमत दिले आहे.

Web Title: In Dapoli Nagar Panchayat, the post of Mayor belongs to ShivSena and the post of Deputy Mayor belongs to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.