हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:06 PM2023-12-14T12:06:12+5:302023-12-14T12:08:36+5:30

कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

Action Force for Pest Control of Hapus | हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार

हापूसवरील कीडरोग नियंत्रणासाठी कृती दल, संशोधन करून उपाय शोधणार

रत्नागिरी : वादळी वारे, गारपीट, हापूस आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडींचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा याकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील हापूस आंबा पिकासाठी कृतिदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करून उपाय शोधण्याची मुख्य जबाबदारी या कृतिदलाकडे देण्यात आली आहे. तसा शासकीय अध्यादेश जारी झाला आहे.

आठ सदस्यीय कृतिदलात दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. या कृतिदलाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पिकावर येणाऱ्या कीडरोगांच्या प्रभावी नियंत्रणाकरिता संशोधन करून उपाययोजना कराव्यात. तसेच त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनाला सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांची बैठक घेत कृतिदल स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या कृतिदलामुळे संपूर्ण कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

असे आहे कृतिदल

आंबा पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृतिदलाचे अध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक आहेत. या दलामध्ये सदस्य म्हणून कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख, उद्यानविद्या विभाग सहायक प्राध्यापक, कीटकनाशक विभाग सहायक प्राध्यापक, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची तर सदस्य सचिव म्हणून कोकण विभागीय कृषी सहसंचालक यांची नियुक्ती झाली आहे.

Web Title: Action Force for Pest Control of Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.