water leakage from Mahad MIDC | महाड एमआयडीसीत जलवाहिनीला गळती
महाड एमआयडीसीत जलवाहिनीला गळती

- सिकंदर अनवारे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या वाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दुरुस्ती न झाल्याने खोदकाम केलेल्या खड्ड्यांत हे पाणी साचल्याने ई-झोनमधील गटाराला तलावाचे स्वरूप आले आहे. वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचे या परिसरातील कंपन्यांच्या कामगारांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ही गळती सुरू असूनदेखील महाड औद्योगिक महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


महाड औद्योगिक परिसराला पोलादपूरमधील रानबाजिरे धरणातून पिण्याच्या पाण्याचा आणि औद्योगिक वापरासाठी पुरवठा केला जातो. ज्या वाहिनीमधून हे पाणी पुरवले जाते ती जुनी झाली आहे. काही ठिकाणी ती बदलण्यात आली असली तरी काही ठिकाणी जीर्ण वाहिनीतूनच पाणी पुरवठा होत असल्याने गळती सुरू होते.


महाड एमआयडीसीमधील ई-झोनमध्ये एम. एस. केमिकल, अमृत केमिकल, कन्सेप्ट, जॉयसन अमोनिझ, मॅक आॅर्गनिक्स, जेट इन्सुलेशन, ओमकार केमिकल, फ्लुबॉर, खंडोबा इंडस्ट्रीज अशा विविध छोट्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना पुरवठा होत असलेली वाहिनीला ओमकार केमिकल जवळ गळती लागली आहे. २०१८ च्या मे महिन्याच्या आधीपासून ही गळती सुरू आहे. या बाबत परिसरातील कंपन्यांनी पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे पत्र महाड औद्योगिक महामंडळाच्या महाड कार्यालयाला दिले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये हे पत्र देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.


दुरु स्तीकरिता या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्यात उन्हाळ्यातही पाणी साचून राहत होते. शेजारील कंपन्यातील रासायनिक पदार्थ पावसाच्या पाण्याने याच खड्ड्यात येऊन साचले आहेत, यामुळे खड्ड्यातील पाणी रंगीत बनले आहे. ज्या ठिकाणी पाइपलाइन आहे त्या ठिकाणी महाड औद्योगिक परिसरातील गटारदेखील आहेत. यामुळे या लिकेजमधून बाहेरील पाणीही पाइपलाइनमध्ये शिरून दूषित पाण्याचा पुरवठा होत असण्याची शक्यता आहे, यामुळे या परिसरातील कारखान्यांच्या कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. मात्र, कंपन्यांमध्ये पाणी शुद्धिकरण यंत्रणा असली तरी महाड परिसरातील कंपन्यांना एमआयडीसीच दूषित पाणी देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 

जलवाहिनी जुनी असल्याने दुरु स्तीसाठी निविदा काढली होती, निविदा प्रक्रिया पूर्ण नसल्याने कामासाठी विलंब झाला होता. आता कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू के ले जाईल.
- एस.एस.गीते, उपअभियंता, एमआयडीसी, महाड
 

तांत्रिक त्रुटींमुळे पाणी वाया
च्ई-झोनमधील कंपन्यांनी ही बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली होती. मात्र, पाइपलाइनच्या पाण्याचा फ्लो मोठा असल्याने बाहेरील पाणी आत जाणे शक्य नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून वेळ मारून नेली आहे.
च्एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू असून महाड औद्योगिक क्षेत्रात मात्र रानबाजिरे धरणातील पाणी एमआयडीसीच्या तांत्रिक चुकांमुळे वाया जात आहे. यामुळे पाणीगळती रोखली जावी, अशी मागणी वारंवार करूनही दुर्लक्ष होत आहे. पिण्याचे पाणी अशा प्रकारे वाया घालवले जात असल्याने संबंधित अधिकाºयांवर कारवाई करणे आवश्यक आहे.


Web Title: water leakage from Mahad MIDC
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.