उमटे धरणातील भिंतीची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:18 PM2019-07-06T23:18:41+5:302019-07-06T23:18:52+5:30

ग्रामस्थांमध्ये घबराट । वर्षभरापूर्वीच केली डागडुजी; मात्र परिस्थिती जैसे थे

Wall collapsed of umate Dam | उमटे धरणातील भिंतीची पडझड

उमटे धरणातील भिंतीची पडझड

Next

- आविष्कार देसाई


अलिबाग : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाची योग्य डागडुजी न केल्यामुळे ते फुटून २३ नागरिकांना प्राण गमवावा लागला होता. तशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची होण्याची शक्यता स्थानिकांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.


सध्या धरणाच्या कमकुवत झालेल्या भिंतीतून पाणी वेगाने झिरपत आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या तळाकडील बाजूनेही पाणी बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे भिंत फुटण्याचा धोका अधिक वाढला आहे. सुमारे ४१ वर्षे वयोमान असणाऱ्या धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या वर्षी वरच्यावर मलमपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसात धरणाची काय स्थिती राहील याबाबत ग्रामस्थांमध्ये घबराट आहे.


तालुक्यातील तब्बल ५२ हजार नागरिकांची तहान भागवणाºया उमटे धरणाच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पावसाच्या कालावधीमध्ये पाण्याचा दाब प्रचंड वाढून धरणाच्या भिंतीला भगदाड पडून फार मोठ्या आपत्तीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थानिकांनी याबाबत सातत्याने प्रशासनाला निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेत धरणाची थातूरमातूर डागडुजी केल्याचा आरोप ग्रामस्थ अ‍ॅड. राकेश पाटील यांनी केला.


धरणाच्या भिंतीतील दगडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने भले मोठे भगदाड पडले होते. जिल्हा परिषदेने यातील काही भिंतीची दुरुस्ती केली,परंतु केलेले कामच निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उमटे धरणाची क्षमता ८७ दलघमी पाणी साठ्याची आहे. त्यातच पावसाचा जोर अधूनमधून वाढत असल्याने पूर्ण क्षमतेने धरण भरण्यास काहीच कालावधी लागणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यास धरणाच्या पोटातील पाण्याचा ताण हा धरणाच्या भिंतीवर येण्याची शक्यता आहे. भिंती आधीच कमकुवत झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने केलेले काम हे कुचकामी ठरून मोठी आपत्ती ओढवू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.


जनतेच्या तीव्र भावनांकडे आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते. उमटे धरणाचा प्रश्नाबाबत वेळीच योग्य दखल घेतली गेली नाही तर, काही तरी विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. याच प्रकरणात सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती जनता दल सेक्युलरचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.


२००९ साली अलिबागमध्ये राज्यस्तरीय पाणी परिषद पार पडली होती. त्यामध्ये राज्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मात्र जिल्ह्यात कमी संख्येने धरणे आहेत, तसेच जी आहेत त्याची पाणी साठवण क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पावसाचे अब्जो लीटर पाणी समुद्राला जाऊन मिळते. जुन्या धरणांची डागडुजी आणि नव्याने काही धरणांची निर्मिती करण्याकडे सरकार आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा संघटक राजेंद्र वाघ यांनी स्पष्ट केले.
 

जिल्ह्यातील छोटी-मोठी धरणे, मातीचे बंधारे यांची आता काय स्थिती आहे याची माहिती घेण्याच्या सूचना जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच सतर्क राहून तत्काळ माहिती देण्यासही संबंधिताना आदेश दिले आहेत.
- विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी रायगड

Web Title: Wall collapsed of umate Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.