कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

By निखिल म्हात्रे | Published: March 29, 2024 11:28 AM2024-03-29T11:28:06+5:302024-03-29T11:28:50+5:30

पाणवठे स्वच्छ करून केली सुविधा

Since the forest department has taken the initiative to clean the water bodies in the forest, now the poaching of animals will stop | कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पाणीटंचाईत केवळ माणसेच होरपळतात असे नाही, तर पक्षी-प्राण्यांनाही त्याचा फटका बसतो. पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात आणि कोणाची तरी शिकार बनतात. त्यामुळे प्राण्यांना जंगलातच मुबलक पाणी मिळावे, यासाठी वन विभागाने पुढाकार घेत जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधले आहेत. हे स्रोत स्वच्छ करून जंगली प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे लक्षात घेत त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. जंगल भागातील पाणवठे स्वच्छ करून पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा स्रोत खुला करण्याचे आदेश वनक्षेत्रपाल यांना दिले. जिल्ह्यात तातडीने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अलिबागसह सुधागड व अन्य तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे स्रोत शोधले. ते स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

  • प्राणीप्रेमींचाही उपक्रमाला पाठिंबा

उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या संकल्पनेचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून प्राणीप्रेमींनीही या उपक्रमाला पाठिंबा देत पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जंगल भागातील पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटल्यात जमा आहे.

जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगलातील पिण्याचे पाण्याचे स्रोत शोधून ते स्वच्छ करण्यात आले आहेत. यातून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीही चांगले सहकार्य केले आहे.
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग.

Web Title: Since the forest department has taken the initiative to clean the water bodies in the forest, now the poaching of animals will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.