रायगड जिल्हा परिषदेचे उन्हाळी शिबिर आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 02:44 AM2018-04-26T02:44:03+5:302018-04-26T02:44:03+5:30

शहरांमध्ये विविध संस्था समर कॅम्पचे आयोजन करत असतात. त्यामध्ये मुलांना स्वीमिंग, हॉर्स रायडिंग, डान्सिंग, सिंगिंग, अ‍ॅक्टिंग यासह अन्य अ‍ॅक्टिव्हिटी शिकवतात.

Organizing a summer camp for Raigad Zilla Parishad | रायगड जिल्हा परिषदेचे उन्हाळी शिबिर आयोजन

रायगड जिल्हा परिषदेचे उन्हाळी शिबिर आयोजन

googlenewsNext

आविष्कार देसाई ।
अलिबाग : परीक्षा संपल्या की, ठिकठिकाणी ‘समर कॅम्प’च्या जाहिरातींचे बोर्ड आपल्याला सर्रास दिसून येतात. उन्हाळ््याच्या सुट्टीमध्ये मुलांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, यासाठी पालक जास्तीत जास्त काळजी करताना दिसतात. त्यांच्यातील हाच पॉइंट हेरून खासगी संस्थांनी समर कॅम्पचे फॅड आणले आहे. अलीकडे हाच ट्रेंड शहरांमध्ये चांगलाच स्थिरावत आहे; परंतु ‘गड्या आपुला गावच बरा’ असे म्हणणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी रायगड जिल्हा परिषदेने समर कॅम्पच्याच धर्तीवर उन्हाळी शिबिरांची संकल्पना आखली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७०० शाळांतील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना या शिबिरांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनाही समर कॅम्पसारखाच किंबहुना त्याहून अधिक आनंद सुट्टीत घेता येणार आहे. त्यामुळे यंदाची सुट्टी मुलांसाठी धम्माल मस्ती करणारी ठरणार आहे.
शहरांमध्ये विविध संस्था समर कॅम्पचे आयोजन करत असतात. त्यामध्ये मुलांना स्वीमिंग, हॉर्स रायडिंग, डान्सिंग, सिंगिंग, अ‍ॅक्टिंग यासह अन्य अ‍ॅक्टिव्हिटी शिकवतात. त्यासाठी मुलांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात फीही घेतली जाते. शहरामध्ये राहणाºयांना अशा समर कॅम्पची फी परवडणारी असते. त्यामुळेच तर आपल्याला अशा समर कॅम्पमध्ये मुला-मुलींची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आठ दिवस ते १५ दिवसांसाठी असणाºया या समर कॅम्पमध्ये विविध त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते, असा दावा त्या संबंधित संस्थेमार्फत केला जातो. तो खरा असेलही कदाचित; परंतु अशा समर कॅम्पमधून बाहेर पडणारी मुले नेमकी काय शिकली याचा खरेच पालक विचार करतात का, असाही प्रश्न आहे.
समर कॅम्प या शब्दाबद्दल ग्रामीण भागातील मुलांना सहाजिकच अप्रूप आहे; परंतु त्यांच्या आर्थिक प्रश्नामुळे ते त्या शिबिरात जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातील मुलांसाठी अशी शिबिरे जिल्हा परिषदेच्या शाळेतच आयोजित केली, तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते सकारात्मक ठरेल. यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२३ एप्रिल ते ४ मे २०१८ या नऊ दिवसांच्या कालावधीत उन्हाळी शिबिर संबंधित शाळेत पार पडणार आहेत. ग्रामीण भागातील मुलांना पोहणे, घोडे सवारी, नाचणे, गाणे अशा गोष्टी येतच असतात. त्यामुळे उन्हाळी शिबिरामधील मुलांना नेमके काय शिकवले पाहिजे, यावर बरीच खलबते झाली. चित्रकला, रांगोळी, मनोरंजनात्मक पारंपरिक खेळ (विटी दांडू, गोट्या, सूरपारंब्या, लगोरी) नाट्यीकरण, गोष्टी, गाणी, कथा, कविता, बडबड गीते गायन, मातीकाम यासह जमेल तसे इंग्रजी बोलणे, पारंपरिक वेशभूषा करणे, मैदानी खेळ, व्यक्तीमत्तव विकास घडविणारे बाबींचे ज्ञान, सामान्य ज्ञान, मुखवटे आणि सर्वात शेवटच्या दिवशी ‘मला काय व्हायचे’ याबाबत मान्यवर मंडळी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर स्नेहभोजनाने शिबिराची सांगता होणार असल्याचे बडे यांनी स्पष्ट केले. यासाठी कोणतीच फी आकारली जाणार नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेने राबवलेला हा उन्हाळी शिबिराचा उपक्रम खरोखरच चांगला आहे. शिबिरामुळे मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेल.
मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत मिळणार आहे, अशा शिबिरांचे आयोजन दरवर्षी करण्यात आले पाहिजे, असा सूर ग्रामीण भागातील पालकांकडून उमटत आहे.

या शिबिरामध्ये सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शिबिराच्या नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच शिबिर कालावधीत राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल शिक्षणाधिकारी यांना देणे बंधनकारक केले आहे. या शिबिराबाबत सर्व शाळा, गट शिक्षणाधिकारी यांना १८ एप्रिल रोजी पत्राने कळवण्यात आले आहे.

अशा विविध अ‍ॅक्टिव्हिटी शिबिरामध्ये राबवल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल. त्याचा उपयोग त्यांना त्याचे भविष्य घडवताना सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी मदत करणारे ठरेल.
- अभय यावलकर,
मुख्यकार्यकारी अधिकारी

Web Title: Organizing a summer camp for Raigad Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड