दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 01:05 AM2018-12-05T01:05:19+5:302018-12-05T01:05:22+5:30

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे.

A new colony of Dasgaon awaiting a well | दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत

दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

- सिकंदर अनवारे

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे, त्यामुळे वसाहतीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध न होताच विहीर बुजवण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
महामार्गाचे काम सध्या जोराने सुरू आहे. या कामात विविध ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट होत आहेत. दासगावमध्ये नवीन वसाहतीला महामार्गाजवळच असलेली विहीर तहान भागवत आहे. २००५ मध्ये भूस्खलनामध्ये बाधित कुटुंबांसाठी ही वसाहत निर्माण करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांना या विहिरींमुळे मे महिन्यापर्यंत पाणी पुरत होते. महामार्ग चौपदरीकरणात ही विहीर बुजवली जाणार आहे.
दासगाव बंदर परिसरातील ग्रामस्थ २००५ मधील भूस्खलनानंतर या नवीन वसाहतीमध्ये राहण्यास आले. या ठिकाणी वहूर-दासगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक वेळा हा पुरवठा वारंवार खंडित होतो. त्या वेळी विहिरीचा मोठा आधार असतो. ही विहीरदेखील बुजवल्यास भविष्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी फिरावे लागणार आहे.
चौपदरीकरणाच्या कामात विहीर बाधित झाल्यानंतर प्रशासनाकडून या विहिरीचा मोबदला ग्रामपंचायतीकडे देण्यात आला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या संभावित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नवीन विहिरीच्या कामास सुरुवात करणे आवश्यक आहे. या ठिकाणी वहूर गावातील मन्सूर झटाम यांनी चार गुंठे जागा दिली आहे. या जागेत नवीन विहीर करणे आवश्यक आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणतीच हालचाल दिसून येत नाही. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाहता, पर्यायी व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही विहीर बुजवली जाऊ नये, अशी भूमिका सरपंचांनी घेतली आहे.

Web Title: A new colony of Dasgaon awaiting a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.