श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:37 AM2018-05-09T06:37:32+5:302018-05-09T06:37:32+5:30

श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान मिळाले आहे. नारळ, सुपारीच्या बागा व अथांग सागर, ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच तीर्थक्षेत्र यामुळे पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यात नेहमीच गर्दी असते. पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरी भागाचा विकास करण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे मात्र अद्याप दुर्लक्षितच आहेत. तालुक्यातील मदगड व कुसमेश्वर ही त्याचीच उदाहरणे म्हणता येतील.

Historical tourist attractions of Shrivardhan are neglected | श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित

श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित

Next

- संतोष सापते
श्रीवर्धन  - श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान मिळाले आहे. नारळ, सुपारीच्या बागा व अथांग सागर, ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच तीर्थक्षेत्र यामुळे पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यात नेहमीच गर्दी असते. पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरी भागाचा विकास करण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे मात्र अद्याप दुर्लक्षितच आहेत. तालुक्यातील मदगड व कुसमेश्वर ही त्याचीच उदाहरणे म्हणता येतील.
मदगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्ला आहे. जुन्या काळी मदगड किल्ल्यावरून वडवली, बोर्लीपंचतन, वेळास, कुडगाव, दिघी या गावांची टेहळणी केली जायची त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने मदगड महत्त्वाचा किल्ला गणला जाई. श्रीवर्धन ते वांजळे २५ किमी अंतर आहे. बोर्लीपंचतन या शहरापासून ५ किमी अंतरावर दाट वनराईत ७७० फूट उंचीवर मदगड वसलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था व पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे आज किल्ल्याची अवस्था भयाण झाली आहे. मात्र तरीही जुन्या काळातील काही पाऊलखुणा याठिकाणी निदर्शनास येतात. किल्ल्यावर सर्वत्र जंगलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
मदगड किल्ल्याच्या पायथ्याशी वांजळे ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. गौळवाडी, हनुमानवाडी व बौद्धवाडी यांची मिळून वांजळे ग्रामपंचायत असून लोकसंख्या पाचशेच्या जवळपास आहे. परंतु स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. आजमितीस गावात शाळाही नाही. पाच वर्षांपूर्वी गावात प्राथमिक शाळा होती. आज शाळेच्या इमारतीची अवस्था बिकट असून आवारात मोकाट गुरांचा संचार आहे. गावातील मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावात वाहतुकीची व्यवस्था नाही. दिवसात एसटीच्या दोन फेऱ्या होतात, त्या व्यतिरिक्त पर्याय नाही. स्थानिक तरु णांनी किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊलवाट तयार केली आहे. परंतु दाट वनराईमुळे पाऊलवाट शोधणे कठीण जाते.
मदगड किल्ल्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता असल्यास पर्यटक याठिकाणी भेट देऊ शकतील. त्यासोबत किल्ल्यावर पाणी, निवारा व वाहतुकीची साधने उपलब्ध केल्यास पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते. पर्यटन विकास व पुरातत्व विभागाने लक्ष दिल्यास मदगड या ऐतिहासिक वास्तूचे जतन शक्य आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल येथे कुसमेश्वराचे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची उभारणी गोल घुमटाकार असून मुख्य मंदिराच्या परिसरात पांडवकालीन विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे. तसेच अनेक भग्नावस्थेतील विविध देवदेवतांच्या मूर्ती परिसरात आढळून येतात. कुसमेश्वर (देवखोल) ते श्रीवर्धन २० किमीचे अंतर असून म्हसळा धनगरमलई मार्गे देवखोल १५ किलोमीटर अंतरावर आहे. बोर्ली पंचतन ते देवखोल ९ किमी अंतर आहे. दिवेआगरला भेट देणारा पर्यटक वर्ग कुसमेश्वर व मदगडला भेट देऊ शकतो. परंतु वाहतूक व्यवस्था व कुसमेश्वर आणि मदगडविषयी पर्यटकांना माहिती उपलब्ध करण्यात पर्यटन विभागास अपयश आले आहे.
पर्यटनाचा विकास झाल्यास वांजळे, दांडगुरी, वावे, बोरला, नागलोली, धनगरमलई या गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल, परिणामी गावातून मुंबई-पुणे या शहराकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होईल. पर्यायाने स्थानिकांना रोजगार उपलब्ध उदरनिर्वाहचा प्रश्न मिटेल.

राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांची तरतूद रायगड किल्ला संवर्धनासाठी केली ही चांगली बाब आहे. त्या सोबत इतर किल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात प्रथमच स्थानिक किल्ले संवर्धनासाठी ५० लाख रु पयांची तरतूद आम्ही केली आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या नियोजनाच्या बैठकीत मदगड व कुसमेश्वर या दोन्ही पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधा व विकासाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल. तसेच स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न अग्रणी असेल.
- अदिती तटकरे, अध्यक्षा, जि.प.

मदगड किल्ल्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल व भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. आम्ही चार वर्षापूर्वी त्यासंदर्भात प्रयत्न केला होता.
- श्याम भोकरे, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य
म्हसळा-कुसमेश्वर रस्त्याची दुरवस्था
पर्यटन स्थळांच्या विकासाबरोबरच स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधांचा अभाव दूर होणे गरजेचे आहे. पर्यटनासाठी महत्त्वाचा घटक रस्ते आहे. म्हसळा ते कुसमेश्वर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यटक त्या रस्त्यावर जाण्यास धजत नाहीत. सार्वजनिक बांधकाम खात्याने कासार कोंड ते दांडगुरी या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पर्यटकांना मदगड (वांजळे) व कुसमेश्वर यांचे निर्देशन करणारे फलक सुद्धा दृष्टीस पडत नाहीत.

मदगड किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून मदगड किल्ल्यासंदर्भात विचारणा झाली होती. आमच्याकडे नैसर्गिक जलस्रोत असल्याने बारमाही पाणी जनतेस उपलब्ध आहे.
- जी. एस. सुर्वे, ग्रामसेवक, वांजळे

Web Title: Historical tourist attractions of Shrivardhan are neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.