पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:51 PM2019-05-30T23:51:55+5:302019-05-30T23:52:07+5:30

दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही.

Five wells, bore holes dry | पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या

पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या

कांता हाबळे 

नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब गावात गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचही विहिरी आटल्या आहेत. गावातील बोअरवेल कोरड्या पडल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कळंब गाव पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट नसल्याने शासकीय नियोजनानुसार टँकरने पाणी देण्यातही अडचणी येत आहेत.
कर्जत-मुरबाड राज्यमार्गावर असलेल्या कळंब गावात तीन हजारांची लोकवस्ती आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी साळोख येथे असलेल्या पाझर तलावातून नळपाणी योजना १९८० च्या दशकात सुरू करण्यात आली होती. कळंब गावापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या साळोख तलावातील बंधाºयात विहीर बांधून पाणी कळंब गावात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेल्या १५ वर्षांत ही नळपाणी योजना कोलमडली असून सातत्याने दुरुस्ती करावी लागत असल्याने खर्चही अमाप होत आहे. दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही.

साळोख येथील तलावातील पाण्यावर केलेली नळपाणी योजना बंद पडल्यानंतर जिल्हा परिषदेने या गावासाठी कळंब-बोरगाव रस्त्यावर असलेल्या पोश्री नदीमध्ये सिमेंट बंधारा बांधून त्यात विहीर खोदून पाणी योजना राबविण्याचा प्रयत्न झाला. पण बंधाºयाला पहिल्याच वर्षी गळती लागल्याने पाणी योजना पुन्हा कोलमडली. गेल्या अनेक वर्षांपासून कळंब गाव स्वत:च्या नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहे.
बोरगाव रस्त्यालगत असलेल्या कूपनलिकेचा ग्रामस्थांना एकमेव आधार होता. या कूपनलिकेतील पाणी उचलून ते कळंब गावातील चार विहिरीत सोडले जायचे आणि त्यानंतर ते ग्रामस्थांना मिळायचे. असे मागील नऊ वर्षे सुरू असताना यंदा कूपनलिकेनेही तळ गाठला आहे. त्यातून पाणी येईनासे झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या, कूपनलिकेतूनही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना दोन किमीवर असलेल्या साळोख गावातून पाणी आणावे लागत आहे. येथील खासगी बोअरवेलचे पाणी मिळायचे. मात्र, त्यांनीही आता तळ गाठला आहे.

आमच्याकडे असलेल्या टँकरच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे; पण लोकवस्ती जास्त असल्याने पाणी वितरणात अडचणी येत आहेत. त्यात कूपनलिकेतून पाणी वितरणासाठी असलेली वाहिनी कापण्यात आल्याने पाणी सर्व ठिकाणी पोहोचत नाही. - माधुरी बदे, सरपंच, कळंब

कळंब हे गाव तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट नाही, त्यामुळे शासकीय टँकर देता येत नाही; परंतु आम्ही ग्रामपंचायतीला पत्र दिले असून त्यांच्या पातळीवर टँकर सुरू केल्यास आमची हरकत नाही. - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

गाव पाणीटंचाई कृती आराखड्यात नाही म्हणून पाणी दिले जात नाही असे नाही. माणुसकीच्या भावनेतून पाणी पुरविण्याची जबाबदारी शासन म्हणून आहे, त्यामुळे नळपाणी योजनेबाबत माहिती घेऊन पाणी पुरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. - अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

Web Title: Five wells, bore holes dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.