आरसीएफमध्ये सुरक्षेसाठी सीआयएसएफचे मॉकड्रिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:06 AM2018-07-01T03:06:54+5:302018-07-01T03:07:02+5:30

अतिरेकी कारखाना क्षेत्रात घुसल्याच्या अचानक आलेल्या या संदेशामुळे काही क्षण सीआयएसएफ कंट्रोलरूममध्ये एकदम सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले.

 CISF's MockDrill for RCF Security | आरसीएफमध्ये सुरक्षेसाठी सीआयएसएफचे मॉकड्रिल

आरसीएफमध्ये सुरक्षेसाठी सीआयएसएफचे मॉकड्रिल

Next

- जयंत धुळप

अलिबाग : थळ-वायशेत येथील केंद्र सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लि. (आरसीएफ) या आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या खत निर्मिती प्रकल्पाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स’(सीआयएसएफ) नियंत्रण कक्षास शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता एक संदेश आला...‘हॅलो कंट्रोलरूम... आपल्या आरसीएफ कंपनी क्षेत्राच्या कुंपणावरून चार अतिरेकी घुसले आहेत... अ‍ॅक्शन’
अतिरेकी कारखाना क्षेत्रात घुसल्याच्या अचानक आलेल्या या संदेशामुळे काही क्षण सीआयएसएफ कंट्रोलरूममध्ये एकदम सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले. सीआयएसएफ कंट्रोलरूम प्रमुखाने सीआयएसएफ आरसीएफ थळ युनिटप्रमुख डेप्युटी कमांडर प्रसाद अवधेशकुमार यांनी या गंभीर संदेशाची तत्काळ माहिती दिली. त्याच क्षणाला डेप्युटी कमांडर प्रसाद अवधेशकुमार यांनी तत्काळ आपत्कालीन परिस्थिती निवारण योजना अमलात आणली.
सत्त्वर रायगड पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला या आपत्कालीन परिस्थितीची माहिती वायरलेस, मोबाइल आणि लॅण्डलाइन फोन्सवरून देण्यात आली. परिस्थितीचे गाभीर्य तत्काळ विचारात घेऊन दुसºयाच क्षणाला रायगड पोलीस बॉम्ब निकामीकरण पथक(बीडीडीएस) आणि रायगड पोलीस क्विक रिस्पॉन्स टिम(क्यूआरटी) यांना वायरलेसवरून अतितत्काळतेचा संदेश देण्यात आला आणि काही क्षणांतच रायगड पोलीस बीडीडीएस, डॉगस्कॉड आणि रायगड पोलीस क्यूआरटी टिम्स आरसीएफ थळ काराखान्यात दाखल होऊन सीआयएसएफ सशस्त्र कमोंडो पथकाबरोबर आपत्कालीन परिस्थिती निवारण योजनेनुसार सज्ज झाले.
याच काही क्षणांच्या काळात सीआयएसएफ कंट्रोलरूमने आरसीएफ थळ अग्निशमन दल आणि आरसीएफ रुग्णवाहिका यांना अतितत्काळतेचा संदेश दिला आणि या दोन्ही यंत्रणा पुढील काही मिनिटांत आपत्कालीन परिस्थिती निवारण योजनेनुसार सज्ज झाल्या. त्याच वेळी आरसीएफ व्यवस्थापनास या गंभीर परिस्थितीबाबत कल्पना देण्यात आली.
सीआयएसएफ व्हीजिलन्स पथकाने संदेश मिळाल्यापासून केवळ १५ मिनिटांत म्हणजे ५.४५ वाजता कंपनी क्षेत्रात घुसलेले अतिरेकी नेमके कुठे आहेत हे शोधून काढण्यात यश मिळविले. ‘हे अतिरेकी आधुनिक शस्त्रधारी आरसीएफ थळ कारखाना क्षेत्रातील राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्ट्रीने अत्यंत संवेदनशील अशा ‘हेवी वॉटर प्लॅन्ट’च्या कंट्रोलरूममध्ये पोहोचले असून, त्यांनी तेथील काही अभियंत्यांना ओलीस ठेवले आहे.’अशी माहिती व्हीजिल पथकाने उपलब्ध करून दिली आणि प्रसंगाचे गांभीर्य अधीकच वाढले. अतिरेकी हेवी वॉटर प्लॅन्टच्या कंट्रोलरूम मध्ये असल्याचे समजल्याने या प्लॅन्टचे प्रमुख महाव्यवस्थापक मिलिंद देव यांना याबाबतची माहिती देऊन त्यांना सतर्क करण्यात आले.

एका तासात रेस्कू आॅपरेशन यशस्वी
नेमके अतिरेकी कोण हे काही सेकंदात ओळखून त्यांना मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात सीआयएसएफ कमांडोंना यश आले. अतिरेक्यांना निशस्त्र करून कंट्रोलरूमच्या बाहेर आणून कंट्रोलरूममधील अभियंत्यांना ओलिस मुक्त करण्यात आले आणि अतिरेक्यांचा मुकाबला करण्याचे हे रेस्कू आॅपरेशन यशस्वी करून मॉकड्रिल ६.३० वाजता पूर्ण झाली.

रेस्क्यू आॅपरेशनचे नियोजन
सीआयएसएफ डेप्युटी कमांडर प्रसाद अवधेशकुमार यांनी पुढील काही क्षणातच, नेमका अ‍ॅक्शन प्लॅन काय असेल, कोणी कोणती जबाबदारी निभावायची, फायरिंग करण्याची वेळ आलीच तर कोणत्या प्रकारे कोणी आणि कधी फायरिंग करायचे, या बाबतची अंतिम कार्यवाही अर्थात रेस्क्यू आॅपरेशनचे नियोजन सीआयएसएफ सशस्त्र कमोंडो टिम, रायगड पोलीस बीडीडीएस, रायगड पोलीस क्यूआरटी, आरसीएफ थळ अग्निशमन दल आणि आरसीएफ रुग्णवाहिका यांना स्पष्टपणे समजावून सांगितले.

सशस्त्र कमोंडो आणि क्यूआरटी जवानांचा घेराव
अतिरेक्यांना कोणत्याही प्रकारे कोणतीही कल्पना येणार नाही याची सारी दक्षता घेऊन, सीआयएसएफ सशस्त्र कमोंडो आणि रायगड पोलीस क्यूआरटी जवानांनी अतिरेकी घुसलेल्या ‘हेवी वॉटर प्लॅन्ट कंट्रोलरूम’ला चारही बाजूने घेरले. काही क्षणाचा श्वास घेऊन, चार सक्षस्त्र सीआयएसएफ कमांडो जवानांनी जमीन आणि पायºयांवरून रांगत जाऊन हेवी वॉटर कंट्रोलरूममध्ये मोठ्या शिताफीने प्रवेश मिळविला. त्याच सुमारास रायगड पोलीस बॉम्ब निकामीकरण पथक(बीडीडीएस)चे जवान व तंत्रज्ञानाने या कंट्रोलरूममध्ये अत्यंत सावधानतेने प्रवेश मिळविला.

Web Title:  CISF's MockDrill for RCF Security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड