विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:25 AM2024-04-02T09:25:48+5:302024-04-02T09:46:11+5:30

कपडे ट्रायल करण्याच्या निमित्ताने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते

would come by plane and steal branded clothes shoes from malls Four yards from Rajasthan | विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

विमानाने यायचे अन् मॉलमधून ब्रँडेड कपडे, शूज चोरायचे; राजस्थानातील चौघे गजाआड

किरण शिंदे

पुणे : राजस्थानातील जयपूर ते मुंबई असा प्रवास विमानाने करायचे. त्यानंतर मुंबईतून झूम कारद्वारे ॲप भाड्याने घेऊन पुण्यात यायचे. आणि त्यानंतर त्यांचा खेळ सुरू व्हायचा. शहरातील वेगवेगळ्या मॉलमध्ये जाऊन ब्रॅण्डेड कपडे आणि शूज चोरायचे. मात्र पुणे पोलिसांनीचोरी करणाऱ्या या तिघांना रंगेहात पकडले. राजस्थानातील या तीनही चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरलेले शूज, बेल्ट, ब्रँडेड कंपनीच्या पॅन्ट आणि टी-शर्ट असा एकूण चार लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

योगेश कुमार लक्ष्मी मीना (वय २५, ग्राम सूरोड, तहसील सुरोड, जिल्हा करौली, राजस्थान), गौरव कुमार रामकेश मीना (वय १९, ग्राम पोस्ट गणीपूर, तहसील शिखराय, जिल्हा दौसा, राजस्थान), सोनू कुमार बिहारीलाल मीना (वय २५) आणि बलराम हरभजन मीना (वय २९, ग्राम गणीपूर, तहसील शिखराय, जिल्हा दोसा राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात कलम 380 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी संगमवाडी येथील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानातून आरोपी बाहेर पडत होते. मात्र एक्झिट गेटवरील सिक्युरिटी अलार्म वाजल्याने आरोपी पळून जात होते. सिक्युरिटी गार्डनी पाठलाग करून यातील दोघांना ताब्यात घेतले. या दुकानाच्या परिसरात उभ्या असणाऱ्या त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये त्यांना ब्रॅण्डेड कंपनीचे कपडे, शूज, बेल्ट आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. 

आरोपी राजस्थानातील जयपूर येथून मुंबईत विमानाने यायचे. तिथून झूम ऐपद्वारे कार करून वेगवेगळ्या शहरात जायचे. त्या ठिकाणी असणाऱ्या मॉलमध्ये चोऱ्या करायचे. कपडे ट्रायल करण्याच्या निमित्ताने एकावर एक अनेक कपडे घालून ते चोरी करत होते. संपूर्ण भारतात मोठ्या शहरात जाऊन चोरी करण्याची त्यांची पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली.

Web Title: would come by plane and steal branded clothes shoes from malls Four yards from Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.