पाणीकपातीचा फटका, टँकरच्या संख्येतं मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:13 AM2019-01-12T01:13:42+5:302019-01-12T01:13:57+5:30

महिन्याला १८ ते २० हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा : गेल्या ३ महिन्यांत टँकरच्या संख्येत ३ ते ४ हजारांची वाढ

 Watercourse, huge increase in the number of tankers | पाणीकपातीचा फटका, टँकरच्या संख्येतं मोठी वाढ

पाणीकपातीचा फटका, टँकरच्या संख्येतं मोठी वाढ

Next

सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : शहरात सध्या सुरू असलेल्या अघोषित पाणीकपातीचा मोठा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत असून, गेल्या तीन महिन्यांत शहरात टँकरच्या फेऱ्यांत मोठी वाढ झाली असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे उपनगरांबरोबरच शहराच्या मध्यवस्तीतही अनेक सोसायट्यांना सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सप्टेंबर २०१८मध्ये मुठा उजवा कालवाफुटीनंतर शहरामध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिका मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलते, असे सांगून जलसंपदा विभागाने पोलीस बंदोबस्तात खडकवासला धरणावरील महापालिकेचे पंपिंग स्टेशन बंद केले होते. तर, सध्या राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत काटकसरीने वापरण्याची गरज असल्याचे सांगून कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराचा पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लोकसंख्येनुसारच महापालिकेला पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय दिला.
यामुळे तीन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा सातत्याने विसकळीत होत आहे. सध्या प्रशासनाकडून पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील टँकरची वाढलेली संख्या लक्षात घेता, शहरामध्ये अघोषित पाणीकपात सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात वर्षभर काही भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु पाणीकपातीच्या चर्चेमुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली. आतापर्यंत प्रामुख्याने वडगावशेरी, विश्रांतवाडी, चंदननगर, खराडी या भागात सर्वांधिक टंचाई होती; परंतु आता हडपसर, बाणेर, धायरी या उपनगरांसह शहराच्या मध्यवस्तीत लॉ कॉलेज रोड, कर्वेनगर, कोथरूड, सहकारनगर आदी सर्वच भागांमध्ये टँकरची मगाणी वाढत आहे. महापालिकेचे टँकर कमी पडत असल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या खासगी टँकर लॉबीकडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे.

शहरातील गेल्या दोन वर्षांतील टँकरची संख्या
महिने वर्ष व टँकरची संख्या
२०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९
सप्टेंबर १५४५२ १२५२६ १५९६६ १८२३५
आॅक्टोबर १६२३३ १२५४२ १००२९ २०३०९
नोव्हेंबर १३४६४ १२४३१ १६२६५ १७७९४
Þडिसेंबर १४९६१ १३२४७ १५५७१ १९४१५

आॅक्टोबरपासूनच टॅँकरच्या संख्येत वाढ
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शहरामध्ये आॅक्टोबरपासूनच टँकरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. सरासरी १६ ते १७ हजार टँकर दर महिन्याला लागत असताना आॅक्टोबरपासून टँकरची संख्या तब्बल २० हजारांच्या पुढे गेली. डिसेंबर २०१८ मध्ये ती शहरामध्ये एका महिन्यात १९ हजार ४१५ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये महापालिकेच्या टँकरची संख्या १ हजार ९४० असून, ठेकेदार नियुक्त करून तब्बल १२ हजार ६६४ टँकरद्वारे आणि खासगी ४ हजार ८१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मागणीनुसार टँकर पुरविण्यात येतात
शहरामध्ये गेल्या काही महिन्यांत टँकरची
मागणी वाढली आहे. महापालिकेच्या टँकरबरोबरच प्रशासनाने निविदा काढून खासगी ठेकेदारांचे टँकरदेखील मोठ्या प्रमाणात सुरु केले आहेत.
यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार त्यांची गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून टँकर पुरविण्यात येतात.
-व्ही. जी. कुलकर्णी,
पाणीपुरवठा विभागप्रमुख

Web Title:  Watercourse, huge increase in the number of tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे