बालक-पालक सहलीचा थिटेवाडीत अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:24 AM2019-03-19T01:24:30+5:302019-03-19T01:24:46+5:30

शासकीय नियमानुसार सहल नेताना खूप अडचणी येतात, त्यामुळे छोट्या पटसंख्या असलेल्या शाळांना सहल घेऊन जाणे अवघड व नियमबाह्य होते.

Unique activities in the Thietwadi of the child-parent resort | बालक-पालक सहलीचा थिटेवाडीत अनोखा उपक्रम

बालक-पालक सहलीचा थिटेवाडीत अनोखा उपक्रम

Next

केंदूर - शासकीय नियमानुसार सहल नेताना खूप अडचणी येतात, त्यामुळे छोट्या पटसंख्या असलेल्या शाळांना सहल घेऊन जाणे अवघड व नियमबाह्य होते. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडीचे मुख्याध्यापक मंगेश गावडे व सहशिक्षिका विमल थोरात यांनी पालकांची बैठक घेऊन बालक-पालक सहलीचे नियोजन केले.

सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी, दि.१७ रोजी एकविरा देवी, गगनगिरीमहाराज मठ, महड गणपती तसेच अलिबाग येथील नागाव बिच इत्यादी ठिकाणी नेण्यात आली. एका बालकाबरोबर एक पालक असल्याने कुठल्याही प्रकारची अडचण अथवा समस्या उद्भवली नाही. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून विद्यार्थी व पालकांना घेऊन सहल कोकणदर्शनासाठी गेली. विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन निसर्गाचा आनंद विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही अनुभवला.

खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील पालक व विद्यार्थी यांच्या दृष्टीने ही सहल म्हणजे एक अविस्मरणीय क्षणांची शिदोरीच ठरली. विद्यार्थ्यांबरोबर आईवडील, आजीआजोबा यापैकी एक पालक सोबत असल्यामुळे शाळेच्या सहलीबरोबर घरच्या व्यक्तीसमवेत फिरण्याचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

आपापल्या पालकाकडून विद्यार्थ्यांनी आपले बालहट्टही पुरवून घेतले. समुद्रकिनाऱ्यावर घोडागाडीत बसणे, समुद्रकिनाऱ्यावरील पाण्यामध्ये खेळणे, वाळूच्या सुंदर कलाकृती बनविणे, सुंदर अशा हॉटेलमध्ये एकत्र जेवणाचा लाभ विद्यार्थ्यांसमवेत पालकांनीदेखील घेतला.
शाळेतील मुलांबरोबर आपल्या पाल्यांला पाठविण्यास अनेक पालकांचा विरोध असतो, कारण तो प्रथमच आई-वडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जात असतो. शिक्षकांनी कितीही काळजी घेतली तरी पालकांचा त्यावर विश्वास कमी असतो. त्यामुळे पालकांसहच सहल हा नविन उपक्रम चांगला असल्याचे पालकांनी सांगितले.

पालकांमधून शिक्षकांचे कौतुक

एका आगळ्यावेगळ्या सहलीचे म्हणजेच ‘बालक-पालक सहली’चे उत्कृष्ट आयोजन मंगेश गावडे व शाळेच्या सहशिक्षिका विमल थोरात यांनी केल्यामुळे पालकांमधून दोन्ही शिक्षकांचे कौतुक होत आहे. या सहलीसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर थिटे व सर्व सदस्य, पालक यांनी फार मोठे मोलाचे सहकार्य केले. अशाप्रकारे बालक-पालक सहलीचे आयोजन कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Web Title: Unique activities in the Thietwadi of the child-parent resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे