Traffic services disrupted, the result of the agitation, the detention of the passengers and the passengers | वाहतूक सेवा विस्कळीत, आंदोलनाचा परिणाम, प्रवासी-चाकरमान्यांचा झाला खोळंबा

पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे रेल्वे वगळता शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या काकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्यावी लागली. राज्य परिवहन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिडेटच्या (पीएमपी) अनेक फे-या रद्द झाल्याने चाकरमाने आणि परगावी जाणा-या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
आंदोलक सकाळपासून शहरात फिरत असल्याने लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, तुळशीबाग, मध्यवर्ती पेठा, उपनगरांतील दुकाने दुपारपर्यंत बंद झाली होती. सार्वजनिक बसवर दगडफेकीचे प्रकार घडले, तसेच काही बसची हवा सोडून देण्यात आली. रिक्षा-कॅब ही वाहनेदेखील रस्त्यावर आली नाहीत.
बुधवारी सायंकाळी सहापर्यंत हीच स्थिती पाहायला मिळाली. दळणवळणासाठी वाहनेच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्वारगेट स्थानकातील स्वारगेट-सातारा विनावाहक बस सकाळपासूच बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर, पहाटे व सकाळी काही मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, सकाळी ११ दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढल्याने लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या आगारातून सोडण्यात आल्या नाहीत. त्यामुळे औंरगाबाद, नाशिक, मुंबई, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, नगर व कोल्हापूर अशा लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्या बंद होत्या.

रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी

आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पुणे स्टेशनकडेही आपला मोर्चा वळवला होता. सुमारे १५० कार्यकर्त्यांनी स्टेशनमध्ये घुसून प्लटफॉर्म एकवर जोरदार घोषणाबाजी केली.
स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर आंदोलकांनी उतरण्याच्या प्रयत्न केला असता, त्यांना शीघ्र कृती दलाच्या जवानांनी रोखले. सुमारे १५ मिनिटे घोषणाबाजी केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना स्थानकाबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर काही परिमाण झाली नाही. तसेच, स्थानकावर तोडफोडीचाही काही प्रकार झाला नाही.
पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांंंनी ट्रॅकवर ठिय्या मांडला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली.


Web Title:  Traffic services disrupted, the result of the agitation, the detention of the passengers and the passengers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.