मेट्रोच्या कामामुळे नव्हे वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे कर्वे रस्त्यावर ट्रॅफिक जाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:20 PM2018-05-15T12:20:25+5:302018-05-15T12:20:25+5:30

कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून पोलीस आणि मेट्रोची टीम असूनही काही वाहतूकचालकांच्या बेशिस्तीमुळे पुणेकरांना ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 

Traffic jam on Karve Road due to careless driving | मेट्रोच्या कामामुळे नव्हे वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे कर्वे रस्त्यावर ट्रॅफिक जाम !

मेट्रोच्या कामामुळे नव्हे वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे कर्वे रस्त्यावर ट्रॅफिक जाम !

Next
ठळक मुद्देफुटपाथवरून वाहने नेण्याचा बेशिस्त वाहनचालकांचा अट्टाहास नो पार्किंग असूनही रस्त्यावर गाड्या लावण्यामुळे कर्वे रोड ट्रॅफिक जॅमची समस्या

पुणे : पुणे मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून पोलीस आणि मेट्रोची टीम असूनही काही वाहतूकचालकांच्या बेशिस्तीमुळे पुणेकरांना ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

    पुण्यात सध्या मेट्रोच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. मुळात वाहनांची मोठी संख्या आणि त्यामानाने अरुंद असणाऱ्या रस्त्यांची काही जागा मेट्रोच्या कामासाठी वापरणे सुरु असल्याने वाहतूक कोंडी होणार हे जाहीर होते. मात्र तरीही वाहतूक पोलीस आणि मेट्रोचे कर्मचारी काम सुरु असणाऱ्या ठिकाणी पूर्णवेळ उभे असतात. उन्हाच्या कडाक्यातही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कर्मचारी ट्रॅफिक नियंत्रण करतात. सध्या वनाजजवळील शिवतीर्थनगर, जय भवानी चौक, शाश्वत हॉस्पिटल या भागात काम सुरु आहे. त्याठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी अधिक प्रमाणात कोंडी होते. मात्र वर्दळीचा मानला जाणाऱ्या कर्वे रस्त्यावरही गरवारे कॉलेजच्यासमोर काम सुरु झाल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून तिथे सतत वाहने अडकून बसतात. 

      या ठिकाणी प्रत्यक्ष थांबून बघितल्यावर वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सह्याद्री हॉस्पिटल, बिपीन स्नॅक्स सेंटर या ठिकाणी नागरिक नो पार्किंग असूनही बिनधास्त गाडी लावतात. इतकेच नव्हे तर फुटपाथही चालण्यास शिल्लक राहिला नसून तिथेही गाड्या लावल्या जातात. दुसरीकडे डेक्कनहून कर्वे रस्त्याकडे हॉटेल पॅराडाईज आणि गरवारे कॉलेजच्या पुढच्या गेटवरून जाणारे वाहनचालक तर हद्द करत असून फुटपाथवरून गाडी चालवत नेतात. त्यांच्या या कलेमुळे अनेकजण फुटपाथवर चालायलाही भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया पादचारी नोंदवत आहेत. समोरून येणाऱ्या गाड्या इतक्या वेगात अंगावर येतात की फुटपाथ आम्हाला चालायला असूनही आम्ही चुकून आलो आहोत असे वाटते अशी बोलकी प्रतिक्रिया एका पादचाऱ्याने नोंदवली. गरवारे कॉलेज चौकात रस्ता ओलांडायलाही त्रास होत असून चार-चार पोलिसांनी वाहने थांबवल्यावर नागरिक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. वाहनचालकांची नियम ओलांडण्याची हौस इथेच संपत नसून एखादी ऍम्ब्युलन्स आल्यास तिच्यासोबत वाट काढत पुढे जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या प्रकारामुळे तर सगळ्याच वाहतुकीवर ताण येत असून  संपूर्ण नळस्टॉप चौकापर्यंत वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. 

Web Title: Traffic jam on Karve Road due to careless driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.