इंजेक्शन देण्यासाठी गळ्याला पट्टा आवळला अन् हनीचा मृत्यु झाला

By विवेक भुसे | Published: November 22, 2023 08:06 PM2023-11-22T20:06:27+5:302023-11-22T20:07:15+5:30

चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघा डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला

To administer the injection, the neck strap came undone and Honey died | इंजेक्शन देण्यासाठी गळ्याला पट्टा आवळला अन् हनीचा मृत्यु झाला

इंजेक्शन देण्यासाठी गळ्याला पट्टा आवळला अन् हनीचा मृत्यु झाला

पुणे : वार्षिक लसीकरणासाठी त्यांनी क्लिनिकमध्ये आणले होते. इंजेक्शन देण्यासाठी त्यांनी गळ्याला पट्टा बांधला. तो पट्टा घट्ट झाल्याने त्यात हनी श्वानाचा मृत्यु झाला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघा डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बाणेर पाषाण लिंक रोडवरील एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. संजीव राजाध्यक्ष (वय ६०), डॉ. शुभम राजपुत (वय ३५) आणि त्यांचे दोन सहायक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये १७ नोव्हेबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींकडे हनी नावाचा लॅब्रोडोर जातीचा श्वान होता. त्याचे वार्षिक लसीकरण आणि नेल्स ट्रिमिंग करण्यासाठी विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते. फिर्यादींनी हनीला डॉक्टरांच्या ताब्यात दिले होते. डॉ. राजपुत आणि त्यांच्या दोघा सहायकांनी त्यांच्याकडील पट्ट्याने हनीला झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र राजपुत यांनी लावलेला त्यांच्याकडील पट्टा हा त्याच्या गळ्याला घट्ट बसून त्याला फास बसला. त्यामुळे हनी खाली कोसळला. त्याला उपचारासाठी डॉक्टर क्लिनिकमध्ये घेऊन गेले. त्यानंतर पंधरा मिनिटांनी डॉक्टरांनी फिर्यादींना त्यांच्या हनीचा मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही डॉक्टर श्वानाच्या मृत्यूबाबत फिर्यादींना काही न बोलता तेथून निघून गेले. फिर्यादींचा हनी श्वान चाळीस दिवसाचा असल्यापासून तो बारा वर्षाचा होईपर्यंत त्यांच्याकडे होता. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

Web Title: To administer the injection, the neck strap came undone and Honey died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.