दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा, ३७३ अपघाती मृत्यू, वर्षभरात घडले दीड हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:03 AM2018-01-11T06:03:08+5:302018-01-11T06:03:20+5:30

बेफाम सोडलेला अ‍ॅक्सिलेटर, प्रचंड वेग आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वेडीवाकडी वळणे घेत भरधाव निघालेल्या दुचाकी, जोरजोरात हॉर्न वाजवीत जाणारे चालक हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर नेहमीचेच झाले आहे.

Thirty-three accidental deaths due to two-wheeler travel, one and a half times in one year | दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा, ३७३ अपघाती मृत्यू, वर्षभरात घडले दीड हजार अपघात

दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा, ३७३ अपघाती मृत्यू, वर्षभरात घडले दीड हजार अपघात

googlenewsNext

- लक्ष्मण मोरे

पुणे : बेफाम सोडलेला अ‍ॅक्सिलेटर, प्रचंड वेग आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वेडीवाकडी वळणे घेत भरधाव निघालेल्या दुचाकी, जोरजोरात हॉर्न वाजवीत जाणारे चालक हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर नेहमीचेच झाले आहे. मात्र, वेगात गाडी चालविणे दुचाकीचालकांना भलतेच महागात पडत चालले आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही शहरांमध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. गेल्या वर्षभरात ३७३ अपघाती मृत्यूंपैकी २१२ मृत्यू दुचाकीस्वारांचे असून, त्याखालोखाल १०६ पादचारी अपघातांचे बळी ठरले आहेत. वाहनचालकांची बेदरकार वृत्ती स्वत:सह इतरांच्याही जिवावर उठल्याचे चित्र आहे.
रस्त्यावर होणाºया अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. गेल्या तीन वर्षांत १ हजार २२१ अपघाती मृत्यूंपैकी ६५१ दुचाकीस्वारांना रस्त्यावर प्राण गमवावे लागले आहेत. यासोबतच पादचारी, आॅटो रिक्षाचालक, मोटार, ट्रक, बसेस आणि अन्य वाहनांच्या अपघातांची संख्याही लक्षणीय आहे.
अत्याधुनिक आणि वेगवान दुचाकी वापरण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. यामुळे रस्त्यांवरील ‘रॅश ड्रायव्हिंग’चे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनचालकांची गाड्या चालविण्याची पद्धत पाहून अन्य वाहनचालकांच्या मनात धडकीच भरते. रस्त्यावरून गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण नागरिक जात असतात. शाळकरी मुले, पादचारी यांचीही रस्त्यावर वर्दळ असते. परंतु यांच्याकडे दुर्लक्ष करून बेदरकार वाहनचालक स्वत:च्या धुंदीत बेफाम जात असतात.
वेडीवाकडी वळणे घेत, मैत्रिणींना खूश करण्यासाठी दुचाकी भरधाव चालवल्यामुळे अपघात घडत आहेत. वाहतूक पोलिसांकडून अशा दुचाकींवर कारवाई केली जाते; परंतु वाहनाचा वेग मोजणाºया ‘स्पीड गन’ वाहतूक पोलिसांकडे कमी असल्यामुळे या कारवायांमध्ये मर्यादा येतात. प्रचंड गर्दी असूनही त्या गर्दीमधून ‘गॅप’ काढत जाणारे तरुण, दुचाकीवर मोबाइल कानाला लावून बोलणारे, महामार्गांवर अवजड वाहनांना खेटून घेतली जाणारी वळणे, त्यांना ‘कट’ मारणे अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. विशेषत: वळणांवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर किंवा पदपथाला धडकल्यानेही अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. अनेकदा दारू पिऊन दुचाकी चालवल्यामुळे, तसेच वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे.
शहरातील रस्त्यांवर वर्षाला साधारणपणे दीड हजाराच्या आसपास अपघात होतात. गेल्या तीन वर्षांत प्राणांतिक अपघातांचे प्रमाण घटले असले तरी बेदरकार वृत्ती मात्र अद्याप कमी झालेली नाही. दुचाकी अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण तरुणांचे आहे. अपघात घडविणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे सुशिक्षितांचे आहे. उपनगरातीलच नव्हे, तर शहराच्या मध्यवस्तीतही भरधाव जाणारी वाहने म्हणजे चालतीबोलती ‘किलिंग’ मशिन ठरत आहेत. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या वर्षभरात गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दीड हजार अपघातांमध्ये ३७३ निष्पापांचे बळी गेले आहेत.
अनेक अपघातांत दोष नसताना घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना संयम दाखविल्यास अपघात कमी होऊन होणारी जीवितहानी टळेल. ‘मानवी जीवन अमूल्य आहे आणि ते जपायला हवे,’ असे नेहमी सांगण्यात येते; मात्र हे केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. पुणेकर वाहनचालकांकडून सर्रास होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झाली.

या गोष्टी प्रकर्षाने टाळा
- वेगमर्यादेचे उल्लंघन करणे
- वाहनांमध्ये स्पर्धा करणे
- मर्यादेपेक्षा अधिक माणसे
अथवा सामान भरणे
- वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे
- दारू पिऊन वाहन चालविणे
- धोकादायक अवस्थेत
ओव्हरटेकिंग करणे
- चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणे

वर्षभरातील अपघातांची
वाहननिहाय आकडेवारी

प्रकार मृत गंभीर किरकोळ
पादचारी १०६ १७९ ८०
सायकल ०४ १४ ०४
दुचाकी २१२ ४१७ २२८
आॅटो रिक्षा ०३ ३१ २८
मोटार १८ १८ ५२
ट्रक ०३ ०४ ०४
बस ०२ १३ १८
अन्य वाहने ०१ ०० ०३
अन्य व्यक्ती २४ ३४ २४
एकूण ३७३ ७१० ४४१

Web Title: Thirty-three accidental deaths due to two-wheeler travel, one and a half times in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.