साडेतीन हजार गावांचा घसा कोरडा, एप्रिलपासून जाणवणार टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:08 AM2018-03-30T06:08:36+5:302018-03-30T06:08:36+5:30

राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते

Thirteen thousand villages sore throat, scarcity that will be seen from April | साडेतीन हजार गावांचा घसा कोरडा, एप्रिलपासून जाणवणार टंचाई

साडेतीन हजार गावांचा घसा कोरडा, एप्रिलपासून जाणवणार टंचाई

googlenewsNext

विशाल शिर्के  
पुणे : राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच त्याची सर्वाधिक झळ बसणार असल्याचे संभाव्य पाणीटंचाई अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागाकडे प्रशासनाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. झालेले पर्जन्यमान आणि पावसाळा संपल्यानंतरची तेथील भूजल पातळी याद्वारे हा अंदाज वर्तविण्यात येतो. याशिवाय पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी, ऊस, केळी, संत्रा, द्राक्ष अशा पिकांसाठी होणारा भूजल उपसा हीदेखील भूजल पातळी घटण्याची कारणे आहेत. हा सर्व विचार करूनच संभाव्य टंचाईग्रस्त गावे निश्चित केली जातात. सरासरीच्या वीस टक्क्यांपर्यंतची पर्जन्यतूट ही सामान्य मानली जाते. तर, एक ते २ मीटर आणि त्यापुढे पाणीपातळीत घट असल्यास या भागात पाणीटंचाई जाणवते, असे अहवालात म्हटले आहे.

राज्यात यवतमाळमधील १४ तालुक्यांतील तब्बल ८२३ गावांत संभाव्य टंचाई जाणवेल, असा अंदाज आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील १२८, वणी ११८ आणि कळंबमधील १०९ गावांचा समावेश आहे. वर्ध्यातील देवळी, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात मिळून २३२ गावांना टंचाईची झळ बसेल. सोलापुरातील २४ गावांतील भूजल पातळी खालावली आहे. त्यात अक्कलकोटमधील १५, मोहोळ २ आणि दक्षिण सोलापूर मधील ७ गावांचा समावेश आहे. पाण्याची संभाव्य टंचाई असणाऱ्या या सर्व ठिकाणी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५८ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानात घट झाली होती. त्यामुळे भूजलसाठ्यातही घट झाली.


जिल्हानिहाय संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी
(कंसात बाधित तालुक्यांची संख्या)
जिल्हा गावांची संख्या
यवतमाळ (१४) ८२३
अमरावती (१३) ४६९
अकोला (४) १६३
चंद्रपूर (१४) ४१९
गडचिरोली (८) १६५
गोंदिया (८) १९३
जळगाव (११) २२१
नागपूर (५) ९४
नांदेड (१३) ३११
परभणी (७) ९१
वर्धा (३) २३२

Web Title: Thirteen thousand villages sore throat, scarcity that will be seen from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.